हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा
नांदेड – जागतिक हळद व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादन व ट्रेसेबिलिटीचे महत्त्व अधिक असून “हळद उत्पादनासाठी भारताची जागतिक स्तरावर मजबूत ओळख आहे. दर्जा सुधारणा, ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धन यावर भर दिल्यास आपल्या शेतकरी व उद्योगांसाठी निर्यात संधी अधिक वाढतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव सौ. एन. भवानीश्री यांनी केले.
हळद क्षेत्रातील व्यापार संधी वाढविणे आणि बाजारपेठेतील दुवे मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हळद बोर्डाच्यावतीने, स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्याने आज नांदेड येथील VITS हॉटेलमध्ये हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, देशभरातील निर्यातदार, उद्योग प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव सौ. एन. भवानीश्री यांच्या उपस्थितीत झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी हळद मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी शेतकरी, संस्था आणि निर्यातदार यांच्या समन्वयित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. “खरेदीदार–विक्रेता मेळावे हे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचे प्रभावी व्यासपीठ असून मूल्यवर्धन व चांगला दर मिळविण्यासाठी नवी संधी निर्माण करतात, असेही त्यांनी सांगितले.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोलीचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत संदेश पाठवून हळद-आधारित उद्योग बळकट करण्याचे तसेच शेतकऱ्यांचा मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी सुधारित शेती पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर भर दिल्याचे सांगून संशोधन संस्थांची भूमिका सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान कृषी विभाग, राज्य शासनाच्या उद्योग विभाग, निर्यातदार संघटना तसेच संशोधन संस्था (मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली) यांचे तज्ज्ञ यांनी तांत्रिक सत्रे घेतली. या सत्रांमध्ये हळद लागवडीत उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, निर्यात दर्जा मानके व अवशेष नियंत्रण, मूल्यवर्धनाच्या संधी तसेच सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळद लागवड व जीआय टॅग प्राप्त वायगाव हळदीच्या विपणनाविषयी अनुभव शेअर केले. तसेच खरेदीदार, निर्यातदार, शेतकरी व FPOs यांच्यातील व्यापार भागीदारी व खरेदी संधींबाबत चर्चेसाठी विशेष नेटवर्किंग सत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपसंचालक, स्पायसेस बोर्ड, प्रादेशिक कार्यालय मुंबई सिमांता सैकिया यांनी स्वागतपर भाषण करून हळद मूल्यसाखळीतील विविध घटकांमध्ये सहकार्य वाढविणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले. शेवटी स्पायसेस बोर्ड प्रादेशिक कार्यालय मुंबईच्या सहाय्यक संचालक डॉ. ममता कृष्णा धनकुटे यांनी आभार मानले. हा खरेदीदार-विक्रेता मेळावा हळद उत्पादक व निर्यातदार यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी, दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.
