गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी

14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत पोहोचावे ;एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित ; पालकांनी अफवाना बळी पडू नये
नांदेड –  महिलांमध्ये वाढता गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आढावा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या मोहिमेसाठी सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कोपूरवाड, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, वैद्यकीय अधिकारी मनपा, बालरोगतज्ञ डॉ. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि समुपदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिमेचे स्वरूप आणि अंमलबजावणी :
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या तांत्रिक बाजूवर सखोल चर्चा केली. १४ ते १५ वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण) मुलींना या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र मुलींना लसीचा एकच डोस (Single Dose) दिला जाणार आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तालुकास्तरीय बैठका आणि पालकांचे समुपदेशन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. समाजातील कोणत्याही अंधश्रद्धा किंवा अफवांना पालकांनी बळी पडू नये. आपल्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले. शिक्षण विभागाने शाळांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये याविषयी जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.
विविध आरोग्य योजनांचा आढावा:
या बैठकीत केवळ लसीकरणच नव्हे, तर जिल्हयातील इतर महत्त्वाच्या आरोग्य विषयांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
* NACP (एड्स नियंत्रण), PCPNDT (स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध), NTCP (तंबाखू नियंत्रण) आणि NTEP (क्षयरोग निर्मूलन) या कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
* रक्तपेढी (Blood Bank) मधील साठा, रुग्णवाहिका (Ambulance) सेवांची उपलब्धता आणि जिल्हा कृती दलाच्या (Task Force) कार्याची माहिती घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!