उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच शाळा

नांदेड – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून शाळा आता सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालणार आहेत.

शिक्षण विभागाकडून ५ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, उन्हाळा वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशानुसार प्रत्येक तासिका ३० मिनिटांची ठेवण्यात येणार असून शाळांना ३० मिनिटांची सुटी देण्यात येईल. तसेच शाळेचा वेळ निश्चित करताना मुख्याध्यापकांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करताना शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत निर्धारित अध्यापन तासिकांमध्ये कोणताही बदल होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा अंतिम वेळ ठरवून त्याबाबत तालुकास्तरावर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!