हडको परिसरात खळबळ : होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

होस्टेल चालकाच्या त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप; प्रेत स्वीकारण्यास नकार

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी होस्टेल चालकावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय २५, रा. वाजेगाव) या युवतीने हडको भागातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजशी संबंधित वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी होस्टेल चालकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आकांक्षाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वस्तीगृहाचे चालक जीवन घोगरे पाटील असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये काही ऑडिओ संदेश असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यामध्ये अपमानास्पद व अश्लील शब्दांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात संबंधित वस्तीगृह चालकाविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईक व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी नातेवाईकांनी प्रेत स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!