कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव;१०० स्टॉलची उभारणी

शेतकरी-ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड – कृषि विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” चे आयोजन १५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार आहे.

हा महोत्सव नांदेड शहरवासीयांसाठी एक प्रकारची मेजवानी असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतमालाची खरेदी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांचे स्टॉल, विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच कृषी संलग्न शासकीय विभागांचे स्टॉल असे एकूण १०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध विषयांवर शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच सेंद्रीय उत्पादने (गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) विक्रीसाठी उपलब्ध असतील.

याशिवाय मध, गुळाचा पाक, चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज, विविध फळे व भाजीपाला यांची थेट विक्री होणार आहे. तसेच जात्यावर दळलेली सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय भाज्या, रानफळे, लाकडी घाण्यावर तयार केलेले करडई, भुईमूग, जवस व तीळाचे तेल, बांबूपासून तयार वस्तू, केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्रीही करण्यात येणार आहे.

या महोत्सवाला शहर व जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!