नगरसेवकांच्या प्रतिनिधीमार्फत बैठकीत सहभाग प्रकरणी मनपा आयुक्तांकडे तक्रार

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकृत बैठकीत संबंधित नगरसेवक स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या प्रतिनिधी मार्फत सहभाग घेतल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वजीराबाद येथील रहिवासी गौतम हिरावत जैन यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महानगरपालिकेच्या अधिकृत बैठकीत निवडून आलेल्या सदस्यांचीच उपस्थिती व सहभाग ग्राह्य धरला जातो. मात्र संबंधित नगरसेवक स्वतः अनुपस्थित राहून त्यांच्या प्रतिनिधी मार्फत बैठकीत सहभाग घेतल्याची माहिती मिळत असून, हा प्रकार नियमबाह्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, महानगरपालिका अधिनियम व प्रचलित नियमांनुसार प्रतिनिधी मार्फत सहभागास कायदेशीर मान्यता नसल्यास ही बाब लोकशाही प्रक्रियेचा भंग करणारी ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित बैठकीची उपस्थिती नोंद, कार्यवृत्त व मतदानाचा तपशील तपासण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व चौकशी अहवालाची प्रत लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही मागणी तक्रारदारांनी केली आहे. लोकशाही व पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!