काल रात्री शहरात घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने पुन्हा एकदा युवकांमधील वाढत्या गँगसंस्कृतीचा काळा चेहरा समोर आणला आहे. नांदेड (प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर असलेल्या इ स्क्वेअर सिनेमागृहात ‘धुरंदर’ चित्रपट पाहून परतणाऱ्या युवकांवर मध्यरात्री भीषण हल्ला करण्यात आला. रात्री साधारण १.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान कॅनल रोड परिसरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेत तीन तरुणांनी आपला जीव गमावला, तर तीन कुटुंबांवर कायमचा दुःखाचा डोंगर कोसळला. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरिजीत सिंग गजानन चव्हाण (वय २५) हा आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून सिनेमागृहातून बाहेर पडत असताना त्याच्या हालचालींची माहिती विरोधी गटाला मिळाली होती. चित्रपट संपेपर्यंत दबा धरून बसलेल्या आरोपींनी बाहेर पडताच तलवारी व धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सय्यद आवेज सय्यद खलील (२७), मोहम्मद अरबाज मोहम्मद फारूक (२३) यांच्यासह इतरांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तलवारीच्या गंभीर वारांमुळे अरिजित सिंग चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रतिकार करताना सय्यद आवेज याचाही मृत्यू झाला. दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या मोहम्मद अरबाज मोहम्मद फारूक याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र संतापाच्या भरात अर्जित सिंगचा भाऊ प्रदीप चव्हाण दवाखान्यात पोहोचला आणि तेथेच अरबाजवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अरबाजचाही मृत्यू झाला. एका रात्रीत तीन मृतदेह… आणि तीन उद्ध्वस्त कुटुंबे. गँग विरुद्ध गँग – आयुष्य विरुद्ध अहंकार भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात गँग विरुद्ध गँग असा उल्लेख करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. अर्जित सिंगची स्वतःची गॅंग तर विरोधी गट अनिल पंजाबी यांच्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अर्जित सिंगची आई अनिता गजानन चव्हाण यांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून साई, अभिषेक, शाहरुख उर्फ कबूतर यांच्यासह इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. वय २३ ते २७ — स्वप्न पाहायचं वय की ‘भाई’ बनायचं? मृत्यू पावलेल्या तिन्ही युवकांचे वय २३ ते २७ या दरम्यान. हे वय असतं करिअर घडवण्याचं, आई-वडिलांचे कष्ट फेडण्याचं, घर उभं करण्याचं. पण इथे काय घडलं? कोणी इंजिनिअर व्हायचं स्वप्न पाहिलं नाही… कोणी अधिकारी होण्याचा विचार केला नाही… सगळ्यांना फक्त “भाई” लवकर व्हायचं होतं. चित्रपटातील डायलॉग, सोशल मीडियावरील रील्स आणि स्थानिक दादागिरी यांचं मिश्रण झालं की वास्तव आयुष्य किती भयावह बनतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. भाईगिरीच्या नादात शेवटी काय मिळालं? ना सत्ता… ना पैसा… ना नाव… मिळालं फक्त — पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि रडणारी आई. पोलिसांवर बोट ठेवण्यापूर्वी आरशात पाहा अशा घटनांनंतर नेहमी प्रश्न पोलिसांवर उपस्थित होतात. पण खरी सुरुवात घरातूनच व्हायला हवी. पालकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा — आपली मुलं दिवसा रात्री कुठे जातात? कोणासोबत फिरतात? त्यांचे मित्र कोण? मोबाईलमध्ये काय चालते? अचानक वाढलेली दादागिरी का दिसते? गुन्हेगार एकाच दिवशी तयार होत नाहीत. ते हळूहळू तयार होतात दुर्लक्षातून, चुकीच्या संगतीतून आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मोहातून. वास्तव न्यूज लाईव्हचे वाचकांना आवाहन समाज बदलायचा असेल तर पोलिसांपेक्षा आधी घर मजबूत करावे लागेल. मुलांना “भाई” नव्हे तर जबाबदार नागरिक बनवण्याची वेळ आली आहे. कारण शेवटी… गँग संपतात, भांडणं संपतात, नावं विसरली जातात — पण आई-वडिलांच्या डोळ्यातलं पाणी कधीच सुकत नाही. संबंधित बातमी …. नांदेड शहरात गँगवारचा थरार; ई-स्क्वेअर परिसरात एक आणि दवाखान्यात दोघांची निर्घृण हत्या Kanthak Suryatal Post Views: 4,588 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टिपर गोदावरी नदीत कोसळून सहायकाचा मृत्यू चालक बचावला ऑपरेशन यात्री सुरक्षा व ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ नांदेड विभागाची यशस्वी कामगिरी