मनपा नगरसेवकांविरुद्ध  खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या एका उमेदवाराविरोधात शपथपत्रात खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची लेखी तक्रार  आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.ही तक्रार गौतम जैन यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आलेले उमेदवार सुमित प्रकाश मुथा (जागा क्रमांक क) यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात गंभीर आर्थिक बाबी लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, उमेदवाराने भागीदारी (पार्टनरशिप) व्यवसायातील सहभाग जाहीर केलेला नाही. तसेच दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मंजूर झालेल्या सुमारे ३० लाख रुपयांच्या कर्जाची माहिती दिलेली नसल्याचा आरोप आहे. विक्रीखत क्रमांक ४१४४/२०१७ (दि. २६/०७/२०१७) तसेच गहाण खत हा दस्त क्रमांक ३०८/२०२६ (दि. ८/१/२०२६) यांची माहितीही शपथपत्रात नमूद करण्यात आलेली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय संबंधित कर्जाचा वापर कशासाठी करण्यात आला याची माहिती, गहाण खत वरील शुल्काची माहिती आणि महानगरपालिकेच्या घरकर थकबाकीबाबतची माहितीही जाहीर करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रतिज्ञापत्रात रोख रक्कम ४० हजार रुपये (स्वतः) व २५ हजार रुपये (पत्नी) दाखविण्यात आली असली, तरी निवडणूक खर्चामध्ये मोठी रक्कम खर्च झाल्याचे दिसत असून अतिरिक्त निधीचा स्रोत जाहीर केलेला नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
वरील प्रकार हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप करत संबंधित उमेदवाराची निवड रद्द करावी, फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात या तक्रारीची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!