नांदेड (प्रतिनिधी): प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश देत “प्लास्टिक नको, पृथ्वी निवड” या विषयावर शहरात सामाजिक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेणारा विद्यार्थी कृष्णा विश्वनाथ येडे याने हा उपक्रम पुढाकाराने राबविला.
कृष्णाने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या निमित्ताने दोन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले असून प्रकल्प सादरीकरणासाठी त्याची मुंबई येथे निवड झाली आहे. “मानवी-पर्यावरण आंतरक्रिया” हा विषय निवडून त्याने प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम प्रभावी उदाहरणांसह मांडले.
या प्रकल्पांतर्गत कृष्णाने टायनी एंजल्स स्कूल, (लक्ष्मीनगर) नांदेड येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्लास्टिकचा दैनंदिन जीवनातील अतिरेक कसा घातक ठरतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या, पुनर्वापरयोग्य वस्तू आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहनही त्याने केले.
या कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या कुलकर्णी, नागोराव जोंधळे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पर्यावरण संवर्धनासाठी तरुण पिढी पुढाकार घेत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
“प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्लास्टिक नको, पृथ्वी निवड ; नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक जनजागृती
