आमदार रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत थेट शासन, डीजीसीए आणि संबंधित विमान कंपनीच्या भूमिकेवर कठोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) आणि व्हीएसआर विमान कंपनी यांच्यातील कथित संगनमताचा मुद्दा तपशीलवार मांडला.
अपघातग्रस्त विमान जळाल्यानंतर त्यावरील रंग नष्ट झाला आणि त्याखालील मूळ नोंदणी क्रमांक स्पष्ट झाला. रोहित पवारांनी तो क्रमांक शोधून काढत सांगितले की हे विमान यापूर्वी अमेरिकेत नोंदणीकृत होते. फक्त ८५ तासांची उड्डाण क्षमता शिल्लक असताना असे विमान अजित पवारांना का देण्यात आले, असा थेट सवाल त्यांनी केला.
विमानातील वैमानिकांच्या संभाव्य चुकांचा उल्लेख करत त्यांनी विमानाच्या मालकाच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये कोण-कोण उपस्थित होते, याचाही संदर्भ दिला. विमानाची किंमत, त्यावरील विमा आणि संभाव्य आर्थिक लाभ या सर्व बाबी मांडत त्यांनी मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त केला. विमा अस्तित्वात असूनही मृतांच्या कुटुंबियांना अद्याप कोणतीही भरपाई न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
पिंकी माळी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाला नोकरी देण्यात आली, तसेच विदीप जाधव यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतल्याचे त्यांनी सांगितले; मात्र शासनाने कोणतीही ठोस मदत केलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. अजित पवार स्वतः शासनाचा भाग असताना शासनाकडून दिसणारी अनास्था अधिकच खटकणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
परवा जाहीर झालेल्या अहवालात विमानाचा मॉडेल क्रमांकही चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे शंका उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. विमानात ३,००० लिटर इंधन का भरले गेले, याचेही त्यांनी उत्तर मागितले. इतक्या इंधनात सुमारे ३,००० किलोमीटरचा प्रवास शक्य असताना केवळ बारामतीपर्यंतच्या प्रवासासाठी एवढे इंधन भरण्याची आवश्यकता काय होती, असा त्यांचा प्रश्न होता.
एका तासाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा आजही अनुत्तरित आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मला कोणावर वैयक्तिक शंका नाही; परंतु माझ्या काकांचा आणि महाराष्ट्राच्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. याचा जाब मी विचारणारच, असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले. हा विषय केवळ राजकीय गटांचा नसून जनतेच्या न्यायाच्या भावनेशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कंपनीचा मालक सध्या अमेरिकेत का आहे, याचेही उत्तर मिळालेले नाही, असा सवाल त्यांनी केला. ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचा दावा अधिकृत अहवालात करण्यात आला असला, तरी त्या आगीच्या स्वरूपात ब्लॅक बॉक्स नष्ट होणे शक्य नसल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला.
काही राजकीय पक्ष या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगही सुरू आहे; मात्र रोहित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “माझा काका आणि राज्याचा नेता ही दोन वेगवेगळी नव्हे, तर एकच जबाबदारी आहे. मी हा लढा सोडणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.
त्यांनी फास्ट ट्रॅक चौकशीची मागणी करत जनतेलाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातील प्रत्येक मुद्द्याची निष्पक्ष चौकशी होणे आणि सत्य समोर येणे हीच काळाची गरज आहे.
