नांदेड(प्रतिनिधी)-नवा मोंढा भागातील विकासाच्या नावावर बंदुकधारी सुरक्षा रक्षक असलेला विकासक केतन कुलीनकांत नागडा याला मिळालेल्या बांधकाम परवानगीमध्येच ही अट आहे की, बांधकाम चालू असतांना लगतच्या इमारती आणि बांधकामांना काही हाणी पोहचली तर विकासक जबाबदार राहिल. तरीपण त्या ठिकाणी अनेकांची घरे पडली त्यात एका दिव्यांग मुलीचा जिवगेला तरीपण अद्याप पडलेल्या घरांचे बांधकाम करून देण्यात आले नाही आणि जबाबदारी असतांना जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. या ठिकाणी दुर्घटना घडली त्यादिवशी खा.अशोक चव्हाण यांनी भेट दिली होती आणि योग्य करू असे सांगितले. आता तर महानगरपालिकेत खा.अशोक चव्हाण यांचीच सत्ता आली आहे. तरीपण खोब्रागडेनगरमध्ये पडलेल्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्या ठिकाणचे रहिवासी साखळी उपोषण करत आहेत. 14 जानेवारी 2026 रोजी दुर्घटना घडली आणि आज 18 फेब्रुवारी आहे.
दि.14 जानेवारी 2026 रोजी खोब्रागडे नगरच्या लगत जिनेन इंफ्रा तर्फे केतन कुलीनकांत नागडा व इतरांना शासकीय गोदामाच्या 4361 चौरस मिटर जागेवर विकास करण्याची परवानगी मिळाली. त्यामध्ये 3 तळ घर आहेत. यामध्ये वाणिज्य वापर सुध्दा आहे. वाहनतळ आहे आणि वर सुध्दा चार मजल्यांची परवानगी आहे. म्हणजे सर्वसामान्य नांदेडच्या नागरीकांची मालकी असलेली जमीन विकासाच्या नावाखाली बंदुकधारी सुरक्षा रक्षक प्राप्त केतन नागडाला देण्यात आली. तेवढाच भाग नाही तर शहरात अनेक ठिकाणी केतन नागडाने आपल्या नावावर अनेक कामे केली आहेत. त्यासाठी एक सेवानिवृत्त डम्प्या पोलीस त्याचा सेवक असतो आणि सुरक्षा रक्षक पोलीस तर असतोच असतो.
दि.14 जानेवारी रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर तोंडी स्वरुपात तुमचे घर बांधून देऊ असे सांगण्यात आले. कच्या घरांच्या शेजारी 35 फुट खोल खड्डा खोदला जाणार असेल तर त्या कच्या घरांची वाट लागणारच. नगरपालिकेच्या परवानगीमध्ये सुध्दा शेजाऱ्यांना आणि त्यांच्या बांधकामांना काही त्रास झाला तर जबाबदारी केतन नागडावरच आहे. पण आजपर्यंत तरी काहीच काम झालेले नाही. या ठिकाणचे नागरीक साखळी उपोषण करत आहेत. त्यांनी सर्व जनतेला अर्थात नांदेडच्या नागरीकांना आवाहन केले आहे की, हा फक्त आम्हा गरीबांचा प्रश्न नाही तर हा सर्व मानवतेचा प्रश्न आहे. ते आपल्या प्रसिध्दी पत्रकात लिहितात जेथे मॉल, व्यापारी संकुल उभा राहतो तेथे गरीबांचे घर का पडते? जेथे पैसा बोलतो, तेथे कायदा का गप्प बसतो ? असे सांगून त्यांनी नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकांना आपल्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे. 29 वेगवेगळ्या मुद्यांवर ही बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. आजपर्यंत तरी महानगरपालिकेच्यावतीने एका तरी बांधकाम निरिक्षकाने या जागेत परवानगी प्रमाणे सर्वकाही ठिक चालू आहे काय? याची तपासणीच केली नाही म्हणूनच ही दुर्घटना घडली. वास्तव न्युज लाईव्ह ला प्राप्त झालेल्या खोब्रागडे नगरमधील नागरीकांनी दिलेल्या निवेदनावर प्रमोद भिमराव जोंधळे, चंद्रकला पिराजी भालेराव, राजशिला ज्ञानोबा खंडेलोटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यापुर्वीचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 7 मार्च 2024 रोजी खोब्रागडेनगर 2 मध्ये भेट देवून तेथे असलेल्या अडचणींबाबत पाहणी केली. त्यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता सुध्दा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत हजर होते. त्या अनुशंगाने या घरांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले होते. त्यावेळी खोब्रागडेनगरमधील रहिवाशांनी अभिजित राऊत यांच्यासमक्ष अनेक प्रश्न मांडले होते. त्यात खोदकाम होईल तेंव्हा आमची घरे पडतील हा मुद्दा सुध्दा होता. केतन नागडाला हे काम कोणी दिले. खऱ्या अर्थाने तर याची चौकशी व्हायला हवी आणि ती खा.अशोक चव्हाण पारदर्शकपणे करतील किंबाहुना करायला लावतील आणि ती पारदर्शक चौकशी नांदेडच्या नागरीकांसमोर मांडतील अशी अपेक्षा आहे. कारण या जागेचे खरे मालक नांदेडचे नागरीकच आहेत ना. पण त्याचा फायदा काही मुठभर लोकांना मिळणार आहे हे सुध्द तेवढेच खरे. आता तर नगरसेवक आले आहेत. त्या प्रभागाच्या नगरसेवकांनी सुध्दा तेथे चालणाऱ्या अवैध कामकाजावर देखरेख करावी अशी अपेक्षा खोब्रागडेनगरच्या नागरीकांना आहे.
केतन नागडाच्या विकासकामामुळे गरीबांची घरे पडली; नागरीकांचे साखळी उपोषण
