१९ फेब्रुवारी रोजी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना

नांदेड – माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांचे गुरु भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा यांची धम्मदेसना आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
            ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेला दस दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३६५ दिवस चालणाऱ्या व २४ तास श्रामणेर दिक्षेकरिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात जिल्हा, जिल्हा परिसर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात. दर महिन्यातील पौर्णिमेच्या अनुषंगाने १९ तारखेला पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण, भोजनदान, आर्थिक दान, औषधी तथा विविध वस्तूंचे दान, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांच्या गायनाचे कार्यक्रमासह भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा यांची धम्मदेसना होणार आहे. त्यानंतर रमा माता महिला मंडळ, राजमाता महिला मंडळ, पंचशील नगर, श्रमसाफल्य नगर, यशोधरा महिला मंडळ गंगा काॅलनी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भोजनदानाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्रामणेर भिक्खू संघ यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!