परंपरेचे धडे देणाऱ्यांचा स्वतःच्या आचरणाशी विसंवाद
लोकसभेतील गेल्या काही दिवसांतील घडामोडी भारतीय लोकशाहीसमोरील गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरल्या आहेत. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना बोलण्याची संधी नाकारण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसून आले. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुस्तक प्रकाशित झाले नसेल तर त्यावर चर्चा करता येणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुस्तक प्रकाशित झाले तरी त्यावर बोलण्यास मनाई असल्याचे सांगितले. म्हणजे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी नियमांचा वापर निवडक पद्धतीने केला जात असल्याची शंका अधिक गडद झाली.
याच पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अनुपस्थित असताना प्रभारी अध्यक्षांच्या उपस्थितीत खासदार निशिकांत दुबे यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक पुस्तके दाखवत विरोधकांवर टीका केली. मग प्रश्न असा निर्माण होतो की, विरोधी पक्षनेत्याला पुस्तकाचा संदर्भ देण्यास मनाई आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला त्याच पद्धतीने भाषण करण्यास मुभा हा लोकशाहीतील दुहेरी मापदंड नाही का? विशेष म्हणजे, राहुल गांधी हे माजी थलसेना प्रमुख मनोज नरवणे यांच्या “Four Stars of Destiny” या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करू इच्छित होते. त्या पुस्तकात नमूद केलेल्या काही बाबी सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. जर त्या विषयावर लोकसभेत सविस्तर चर्चा झाली असती, तर सरकारच्या जबाबदारीबाबत अनेक अस्वस्थ करणारे मुद्दे समोर आले असते, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी सभागृहात येणार होते, अशी अपेक्षा असताना ते अनुपस्थित राहिले. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले होते की ते संबंधित पुस्तक पंतप्रधानांना भेट देणार होते. मात्र ही संधीच निर्माण होऊ दिली गेली नाही. लोकसभेतील या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सभागृहात वापरली गेलेली भाषा आणि तिच्यावर झालेली मौन संमती. प्रभारी अध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याऐवजी केवळ औपचारिक आक्षेप घेतल्याचे चित्र दिसले. परिणामी सभागृहाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.विशेष म्हणजे खा. निशिकांत दुबे यांनी आपल्या मावशीच्या मुलीसोबत अर्थात आपल्या बहिणी सोबत लग्न केलेले आहे अमी ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चरित्रावर बोलतात. खा. प्रियंका गांधी यांनी एकदा लोकसभेत सांगितले होते की नेहरूंवर एकदा चर्चाच घडवून घ्या म्हणजे लोकसभेचा दररोजचा वेळ वाचेल. तसे तरी करावे एकदा म्हणजे नेहरू या विषयावर पूर्ण विराम तरी लागेल.
आजच्या काळात लोकशाही म्हणजे विचारांची लढाई असते; पण ती विचारांवर न होता व्यक्तींवर, इतिहासावर आणि मृत नेत्यांवर आरोप करण्याच्या पातळीवर गेल्याचे चित्र दिसत आहे. जिवंत आणि सत्तेत असलेल्या व्यक्तींवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी इतिहासातील व्यक्तींवर टीका करून मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. घटना केवळ संसदीय कार्यवाहीतील वाद नाही; तर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधकांचा आवाज आणि संसदीय परंपरा यांच्यावर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे. लोकशाही टिकवायची असेल तर नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. अन्यथा लोकशाहीचे रूपांतर केवळ सत्तेच्या एकाधिकारात होण्याचा धोका नाकारता येणार नाही.

