‘मायबोली बालसाहित्य संगम’ ;अध्यक्ष बालसाहित्यिक दत्ता डांगे यांचा अध्यक्षीय संवाद

मायबोली मराठी परिषद, मुखेडच्या वतीने  आज दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावरगाव (पि.) ता. मुखेड जि. नांदेड येथे ‘मायबोली बालसाहित्य संगम’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त या संमेलनाचे अध्यक्ष बालसाहित्यिक दत्ता डांगे यांचा अध्यक्षीय संवाद येथे देत आहोत.

………………

सावरगाव  ‘बालसंगम’ अध्यक्षीय संवाद

या पृथ्वीमातेला वंदन
वाऱ्याला वंदन
पाण्याला वंदन
सूर्याला वंदन
चंद्राला वंदन
जन्म देणाऱ्या मातेला वंदन
वडासारखा आधार देणाऱ्या पित्याला वंदन
ज्या गावाने घडविले त्या माझ्या गावाला वंदन
शाळेला वंदन
गुरुजनांना वंदन
ज्यांच्या ज्यांच्यामुळे वाढलो… घडलो त्या सर्व सजीव.. निर्जीवांना वंदन!
मला या ‘बालसंगमा’च्या प्रवाहात सामील करून घेतल्याबद्दल मायबोली मराठी परिषदेला आणि या परिषदेचे सर्व पदाधिकारी व तसेच सर्व सभासदांना वंदन!
।। बालसाहित्यसंगम ।।
‘बालसाहित्यसंगम’… किती ह्रदयंगम हे नाव! ‘बालसाहित्यसंगम’ नाव समोर आले की, डोळ्यांसमोर फुलांची बागच येते. विविध रंगांची, निरनिराळ्या प्रकारची, लोभस अशी सुंदर सुंदर गुणां-सुगंधांची फुले वाऱ्यावर नाचणारी… आपल्या हाताशी… अंगाशी स्पर्श करणारी अन् आपल्याला मोहवणारी… आनंदाने मोहरवून टाकणारी फुले जीवनालाही सुगंधित करून टाकतात. हा दरवळ आपल्या जीवनभर पुरत असतो. अशीच संधी मायबोली मराठी परिषद मुखेडने ‘बालसाहित्यसंगम’ आयोजित करून आपल्याला मिळवून दिली आहे. ‘बालसाहित्यसंगम’ आपणां सर्वांचा जीवनप्रवाह विस्तृत करणारा आहे ही आनंदाची व समृद्धीची गोष्ट होय!
गावाचा अभिमान उरात ठेवा!
—————————–————-
मुलांनो,
ज्या गावात आपला जन्म झाला आहे. जे गाव आपले संगोपन करीत आहे. फुलझाडांची जशी काळजी घेतली जाते तसे ते आपली काळजी घेत आहे. आपल्यावर माया.. प्रेम करीत आहे… लोभ करीत आहे. आपण आजारी पडलो… किंवा काही लागून जखम झाली अथवा अपघात झाला तर संपूर्ण गाव आपल्या मदतीसाठी धावून येते. काळजी वाहते. या गावासाठी आपण एक लाडकं लेकरू असतो. सर्वांचे आवडते फलपाखरू असतो.
म्हणून देवावर जशी भक्ती असते तशी अशा या गावाविषयी ह्रदयात नितांत भक्ती ठेवा. गावातील थोरा-मोठ्यांचा आदर बाळगा. विमानात बसून कितीही उंचावर उडत राहिलोत तरीही आपले लक्ष जमिनीकडेच असते. तसे भविष्यात आपण मोठे झाल्यावर कोणत्याही शहरात अथवा दुसऱ्या देशात नोकरी निमित्ताने गेलोत तरीही लक्ष मात्र आपल्या गावाकडे ठेवा. गावाच्या हिताचा विचार करीत चला. जमेल तसे योगदान देत चला!
आपल्या गावावर जसे आपले प्रेम राहणार आहे तसेच प्रेम आपल्याला जन्म देणाऱ्या आणि जीवन घडविणाऱ्या आई-वडिलावर ठेवा. आपल्या भावा-बहिणींची काळजी घ्या. आपल्या शाळेविषयी जिव्हाळा ठेवा. आपल्या शालेय आणि गावातील सवंगड्यांबदल-मित्र-मैत्रिणींबद्दल मनात आत्मीयता रुजवा.
बोलीभाषेचा अभिमान बाळगा
—————————–———-
मुलांनो,
आपण लहान लहान गावांमध्ये राहतो. आपल्या आपल्या गावची… परिसराची एक भाषा असते. बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात… अन् ते खरेही आहे. तिथल्या भाषेत थोडे शब्द बदलतात. उच्चार बदलतो. शब्दांची हेल बदलते. जशी बैलगाडी रस्त्याने चालताना सर्व रस्ते सारखेच नसतात. काही ठिकाणी धुळीचे रस्ते असतात अशा ठिकाणी बैलगाडी कापसातून चालल्यासारखे वाटेल… काही ठिकाणी रस्ते खडकाळ असतात… तिथे गाडी खडखडाट करीत चालेल… काही ठिकाणी वाळू असेल तर गाडी गाडीचा आवाज बदलेल… शिजलेली दाळ लाकडी चाटूने हटताना जसे वाटते तसे वाटेल… ओहोळ किंवा नदीतून बैलगाडी नेताना तुपातून चमचा फिरवताना जसा मऊशार …गरेदार स्वर येतो तसे वाटते. मस्त गंमत वाटेल! तसेच ठिकठिकाणच्या भाषेचेही असते! तिथल्या भाषेचा गोडवा… नाद काही औरच असतो. तिथल्या मातीचा स्वर गाडीच्या चाकाच्या चालण्याने वातावरणात उमटत असतो. तोच स्वर खरा असतो. तसेच आपण ज्या मातीत राहतोत… खेळतोत… वाढतोत…त्याच मातीचा स्वर आपल्या बोलीतून उमटत असतो! तीच आपली बोलीभाषा होय!
मुलांनो,
ऊस तुम्ही पाहिला आहे. खाल्लाही आहे. उसाचा गोड रसही पिला आहात. हा ऊस काही शहरात लावलेला नाही… ना शहरातल्या रस्त्यावर लावलेला आहे. हा ऊस तर आपल्या काळ्या रानात लावलेला आहे.  आपल्या शेतात ऊस असतो. त्याला पाणी देतोत. वाढवतोत. हा ऊस काही सरळच वाढलेला नसतो. तो वाकडातिकडा कसाही वाढलेला असतो. परंतु गोड किती असतो ना! आपणां सर्वांनाच हा ऊस आवडतो. त्याचा रस आवडतो. त्याचा पाक आवडतो. त्याचा गूळ आवडतो… आणि त्याची साखरही आवडते! या गुणकारी उसाचे किती किती म्हणून उपयोग आहेत! याप्रमाणेच आपल्या गुणकारी बोलीभाषेचेही आहे. त्या भाषेतच आपला जीव की प्राण आहे. या भाषेतच झणझणीतपणा आहे. जोश आहे. दम आहे. दमदारपणा आहे. कणखरपणा आहे. लढाऊपणा आहे. तलवारींचा खणखणाट आहे. माया आहे. मायाळू आहे. प्रेमळ आहे. धिरोदात्त आहे. हीच आपली बोलीभाषा मोहळाचा मध आहे. आणि वेळच पडली तर आग्यामोहळही आहे! बोलीभाषा म्हणजे आपल्या गावाचा आपल्या परिसराचा मौल्यवान ऐवज होय.
आपली बोलीभाषा केवळ ओठांवरची भाषा नव्हेय तर ती आपल्या आत्म्याची भाषा होय. म्हणून या बोलीभाषेचा आपण अभिमान बाळगूया!
सर्वच भाषेवर सारखेच प्रेम करूया
—————————–—————
मुलांनो,
आपल्या भाषेबद्दल जसा आपल्याला अभिमान असणार आहे तसाच अभिमान त्या त्या भागातील आपल्या बंधु-भगिनींना असणार आहे. म्हणून त्यांचा आणि त्यांच्या भाषेचाही आपण आदर करूया. आपण जी प्रमाणभाषा म्हणतो… जी पाठ्यपुस्तकांत असते. ती तर आपल्या अनेक मराठी बोलीभाषेतील  आणि दुसऱ्या राज्यातील, दुसऱ्या देशांतील भाषेतील शब्द घेऊन समृद्ध झालेली असते. या प्रमाणभाषेला काही व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे नियम लावून खेड्यापाड्यातील आणि शहरातील सर्वांना समजेल, सर्वांना अभ्यास करता येईल अशा प्रकारे निर्मिती केलेली असते.
मुलांनो,
एक उदाहरण देतो. मी एकदा आपल्या पंजाब राज्यात गेलो होतो. तेथील भाषा पंजाबी आहे. तेथील गावांची, शहरांची नावे फलकांवर पंजाबी भाषेत आहेत. दुकानांची नावे पंजाबी भाषेत आहेत. त्या भाषेतील ओळींच्या खाली किंवा वर हिंदी किंवा इंग्रजीत एकही ओळ पाहावयास मिळाली नाही. त्यामुळे मी कोणत्या शहरातून जात आहे, कोणत्या खेड्यातून जात आहे, दुकानाचे नाव काय आहे हेही कळत नव्हते. त्यामुळे मी नाराज होत होतो. पुढे पंजाब राज्य संपून हिमाचल प्रदेश लागला. हिंदी भाषेत फलक दिसू लागले… आणि हायसे वाटले. जीवात जीव आला! म्हणून कुठल्याही एकाच भाषेचा अट्टाहास न ठेवता, कुठल्याही भाषेबद्दल द्वेष न ठेवता सर्वच भाषांचा आदर केला पाहिजे.
जेवढ्या जास्त भाषा आपण शिकू… तेवढेच जास्त जग हे आपण आपलेसे करू शकू!
ज्या पुस्तकांनी आपल्याला घडविले
त्या पुस्तकांचे विश्वही घडवूया!
———————————————
मुलांनो,
पुस्तकांशिवाय दिवस नाही. पुस्तकांशिवाय रात्र नाही. पुस्तकांशिवाय इतिहास नाही. पुस्तकांशिवाय भविष्य नाही. हरघडी आपल्या हातात पुस्तक असते. शाळेत पुस्तक असते. शाळेतून जाता-येता आपल्या पाठीवर पुस्तक असते. घरी गेल्यावर अभ्यास करताना आपल्या मांडीवर पुस्तक असते. आपण थकून पलंगावर झोपून वाचतो तेव्हा आपल्या पोटावर-छातीवर पुस्तक असते. पुस्तक हातात नसेल आणि आपण टीव्ही पाहत असलो तरीही पुस्तकातून घेतलेली गोष्टच मालिकेतून दाखविली जाते. पुस्तकात लिहिलेले गाणेच टीव्हीवर दाखवितात. म्हणून आपण पुस्तकांशिवाय नाही. अन् पुस्तक आपल्याशिवाय नाही. पुस्तकानेच आपण आणि जग घडत असते. फुलांच्या नयनमनोहारी बागेत आपण उभे राहिलो तर किती छान वाटते ना! जणू आपण एक फुलपाखरूच झालेले असतोत. तसेच आपण पुस्तकांच्या बागेतील फुलपाखरू असतोत. पुस्तकातला मकरंद… मध गोळा करीत असतोत! सुंदर मधाचे पोळे आपण बनवत असतोत.
मुलांनो,
या पुस्तकांमुळे आपण घडत असतो. मोठे होत असतो. म्हणून तेव्हा आपलेही कर्तव्य आहे की, ‘पुस्तकांना आपणही घडविले पाहिजे!’   … ‘पुस्तकांना आपणही घडविले पाहिजे!’ असे म्हटल्यावर आपणाला आश्चर्य वाटले असेल नाही का! की आपण पुस्तकांना कसे घडविणार? तसे वाटणे साहजिकच आहे.
पण हे बघा मुलांनो,
आपण अनेक लेखकांची पुस्तके वाचतो. गोष्टी वाचतो, अनेक कवी-कवयित्रींच्या कविता वाचतो. त्यांनी त्या त्या काळात ते लिहिलेले असते. त्यांच्या त्यांच्या अनुभवातून ते आलेले असते. तुमचा काळ हा आताचा आहे. त्यांच्या आणि आपल्या काळात खूप बदल झालेले असतात. काळात अंतर असते. तुमचे अनुभव वेगळे असतात. तुमच्या कल्पना वेगळ्या असतात.. त्यांच्या वेगळ्या असतात. त्यांची शब्दकळा वेगळी असते. तुमची शब्दकळा वेगळी असते.
आणि त्या त्या प्रत्येक काळात लेखक, लेखिका निर्माण होणे काळाची गरज असते. त्या त्या काळाचे प्रतिबिंब साहित्यातून दिसत असते. पूर्वी राक्षसांच्या, वेताळाच्या, पऱ्यांच्या गोष्टी असायच्या. नंतर राजा-राणीच्या गोष्टी, कविता आल्या, इसापच्या गोष्टी आल्या, तैमुरलंगाच्या गोष्टी आल्या, बिरबलाच्या गोष्टी आल्या, नीतिकथा आल्या, नंतर विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आले. तशा विज्ञानकथा आल्या. विज्ञानातही जग आता खूप पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता – ए. आय. तंत्रज्ञान आले आहे. यामुळे तर जगामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. तेव्हा हे सारे आपल्या गोष्टीत आले पाहिजे. कवितेत आले पाहिजे. आपला परिसर, आपल्या आई-वडिलांचे कष्ट, समाजातील घडामोडी, वेगवेगळे ऋतू, त्या त्या ऋतूतील बदल आपल्या कथा कवितेतून टिपले पाहिजेत. सणावारात झालेले बदल लिहिले पाहिजेत. आपल्या लिखाणाने साहित्यविश्व… पुस्तकविश्व समृद्ध होत जाणार आहे. म्हणून आपल्याला सुचले ते लिहिले पाहिजे.
मुलां-मुलींनो, तुम्ही लेखक/लेखिका
आहातच… तुम्ही लिहायलाच हवे!
———————————————-
मुलां-मुलींनो,
तुम्हाला परीक्षेत एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगितले जाते. आणि तुम्ही मन लावून… विचार करून सुंदर निबंध लिहिता. तुम्हाला काही मुद्दे दिले जातात आणि त्यावरून कल्पनाविस्तार करून गोष्ट लिहायला सांगितली जाते. तुम्ही मुद्दे वाचता. मनाशी काही विचार करता आणि त्या मुद्द्यांना धरून तुम्ही मस्त गोष्ट लिहिता. कवितेवर प्रश्न विचारला जातो. तुम्ही त्यावरही चिंतन करून उत्तर लिहिता… म्हणजे तुम्ही समीक्षक झालात. म्हणजे तुम्ही लेखकच झालात की! कधी कधी तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी असता… त्यावेळी तुमच्या मनातून कवितेच्या ओळी तरळून जातात… फक्त तुम्ही त्या लगेचच लिहून काढीत नाहीत. त्या लगेचच लिहून काढीत जा… तुम्हीही कवी/कवयित्री आहात.
साहित्य म्हणजे काय…?
——————————
साहित्य लेखन हे आपल्या चालण्या… बोलण्या..अन् वागण्यातच आहे. देवळाच्या घंटेप्रमाणे साहित्य आपल्या अणु-रेणुत आहे. बासरीत आणि सतारीच्या तारेत जसा स्वर दडलेला असतो त्या स्वराप्रमाणे साहित्य आपल्यातही दडलेले आहे… आपल्या घरातल्या पितळेच्या ताटाप्रमाणे साहित्य आहे… ज्वारीच्या उभ्या पिकाप्रमाणे साहित्य आहे… झाडांच्या सळसळीप्रमाणे साहित्य आहे… या सर्वांमध्ये साहित्य भरलेले असते… नाद भरलेला असतो… आपल्या लेखणीत साहित्य भरलेले असते… या सर्व गोष्टींना थोडा धक्का द्यायचा असतो.. थोडी हवा द्यायची असते… घंटेला धक्का दिला की, प्रसन्न असा घंटानाद गावभर पसरतो.. नाद या घंटेतच भरलेला असतो… बासरीला आपल्या ओठांतून लयदार फुंकर मारली आणि बासरीवरच्या बोटांनी नर्तन केले की,  नादमय लकेर मनाला वेडावत जाते. सतारीच्या तारेला हळुवार बोटांनी छेडले की, नाद झंकारत जातो. तसा नाद, तसा झंकार साहित्यरूपाने आपल्याही अंत:करणात आहे. हाती फक्त लेखणी घेऊन लिहीत चला. आपल्यातील सर्व सुखाचे, दु:खाचे, आनंदाचे, निराशेचे, आशेचे सर्व स्वर कविता, कथा, ललित लेखनाच्या रूपाने कागदावर उतरत जातील… आकाशातील पक्षी… जमिनीवर उतरत जावेत त्याप्रमाणे…!
गोष्टी वाचा… गोष्ट सुचत जाईल…!
—————————–—————-
मुलांनो,
तुमच्या समोर तबला, पेटी, सतार, ढोलकी असे काही वाद्ये ठेवलेली आहेत. पण तुम्ही नुसतेच पाहत बसलेले आहात. तर वाद्ये आपोआप वाजतील का? नाही ना! म्हणून आपल्या समोरील एखादे वाद्य जवळ घेऊन थाप दिलात, बोटे फिरवलात की, नाद उमटेल. तसेच साहित्याचे आहे.
तुम्ही गोष्टी वाचायला पुस्तक हातात घ्या. वाचायला सुरू करा. गोष्ट वाचताना किंवा वाचून पूर्ण झाल्यावर तुम्हालाही वेगळे काही सुचत जाईल. नवे काही सुचत जाते. नवे लिहावेसे वाटते. ते लिहा.
तुमच्यावर काहीवेळा संकटे येतात… तुम्ही परेशान होता… तेव्हाची परिस्थिती लिहून ठेवा. आनंदाचेही क्षण येतात. आपले कौतुक होते. तेही लिहून ठेवत चला. लेखणी हाती घ्या आणि जे वाटले ते एका वेगळ्या वहीत लिहीत चला. कविता वाचा. त्या वाचतानाही असेच काही जाणवेल… तेव्हा जे जाणवले ते लिहा. ते मोडकेतोडके कसेही असूद्या.. पण लिहा. सोन्याचे असेच बारीक बारीक कण… बारीक बारीक तुकडे जमा करून पुढे भविष्यात सुंदर अलंकार तयार करता येईल. तेच खरे आणि बावनकशी ‘साहित्यसोने’ होय!
दैनंदिनी लिहा!
——————–
मुलांनो,
तुम्ही आजपासून दैनंदिनी लिहीत चला. ही दैनंदिनी तुम्हाला आयुष्यभर कामी देईल. तुम्ही कधी निराश… दु:खी झाला असलात तर स्वतःलाच धीर देणारे शब्द लिहा. संकटातूनही हिंमतीने चालायला लावणारे लिखाण तुम्ही या दैनंदिनीत करा. घडलेल्या महत्त्वपूर्ण लिखाण या दैनंदिनीत करा. कोणी उपदेश केला असेल आणि तो तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर या वहीत लिहा.
ही दैनंदिनी म्हणजे सोने होय. तुम्ही जसेजसे मोठे व्हाल तसतसे या ‘सोन्या’ची किंमत वाढतच जाते. तुम्हाला तुमच्या कथा, कविता, आत्मचरित्र लिहिण्यासाठी ही दैनंदिनी मोलाची ठरणार आहे. म्हणून दैनंदिनी लिहीत चला!
मित्रांना जपा… माणसांना जपा…
माणुसकीला जपा!
——————————————–
मुलांनो,
काळ बदलतो. भौतिक गोष्टी बदलतात… पण हजारो वर्षांपासूनच माणूस मात्र तोच आहे. हजारो वर्षांपासून त्याचे जे जीवन जगण्याचे विचार असतात… तेच विचार आजही आहेत… उद्याही राहणार आहेत… फक्त सोईसुविधा बदलत राहतील एवढेच काय ते!
पूर्वी प्रवासासाठी बैलगाडी होती, घोडे होते. आता मोटारसायकली आल्या, कार आल्या. विमाने आली.
पूर्वी लिहिण्यासाठी खापराच्या किंवा पत्र्याच्या काळ्या पाट्या होत्या. लेखणी होती. आता टॅब येत आहेत, लॅपटॉप आहेत. सांगायचा मतलब म्हणजे आपल्याला तांत्रिकदृष्ट्या खूप सोईसुविधा लाभत आहेत. परंतु माणूस मात्र शरीराने, विचाराने जशाला तसाच असतो. म्हणून आपल्याला आपला माणूस महत्त्वाचा आहे.

मोबाईल येतील मोबाईल जातील… कॉम्प्युटर येतील कॉम्प्युटर जातील… अजून काही यंत्र येतील जातील… परंतु आपलं मन मात्र तेच राहील…
हजारो वर्षांपासून माणसाला..हवा..पाणी…प्रकाश…निवारा आणि माणुसकी याचीच गरज आहे. बाकी गोष्टी नसल्या तरी चालतात.
माणूस आणि माणुसकी यांची आपल्याला गरज आहे. पुढेही राहणारच आहे. म्हणून माणसांना जपा. माणुसकीला जपा…
आपले आजी-आजोबा, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, गुरुजन वर्ग या सर्वांना जपा.
शेवटी…प्रार्थना करूया
१) आजी.. आजोबांची… आई बाबांची सेवा करीन
२) गुरुजनांची आज्ञा पाळीन
३) आई बाबांचे.. बहिणींचे.. भावांचे.. मित्र.. मैत्रिणींचे कोणाचेही कधीही मन दुखावणार नाही.
४) दैनंदिनी लिहीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!