चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या नवऱ्याला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.तावशीकर यांनी जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पार्डी (खु) येथे 19 मार्च 2022 रोजी ही घटना घडली. शामसुंदर भाऊराव धमेवाड (36) याने आपली पत्नी चंद्रकला हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि या हल्यात तिचा मृत्यू झाला होता. ही घटना पाहणाऱ्या त्यांच्याच दोन मुली होत्या. त्यात एका मुलीचे वय 8 वर्ष आणि दुसऱ्या मुलीचे वय 10 वर्ष होते. या प्रकरणात समोर आलेल्या पुराव्यावरुन न्यायाधीश तावशीकर यांनी पत्नीचा खून करणाऱ्या शामसुंदर भावराव धमेवाडला दि.30 जानेवारी रोजीच पत्नीच्या खूनासाठी दोषी जाहीर केले होते.
आज या प्रकरणाची शिक्षा ठोठावतांना त्यांना न्यायाधीश तावशीकर यांनी शामसुंदरला जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ऍड. मोहम्मद अब्बास मोहम्मद हैदर यांनी बाजू मांडली होती. किनवट येथील पोलीस अंमलदार एन.पी.भालेराव व व्ही.जे. वाघमारे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम केले.
या खटल्यातील मरण पावलेल्या चंद्रकला यांच्या दोन मुली आहेत. त्या सध्या अनाथ आश्रमात राहतात. कायद्यात असलेल्या पिडीतांच्या कुटूंबियांना मदत करण्याच्या प्रक्रियेनुसार न्यायाधीश तावशीकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला पत्र पाठवून या दोन बालिकांना जीवनाचे पुर्नवसन करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या संदर्भाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवितात आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला जातो आणि त्यानंतर ती मदत मंजुर होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!