नांदेड – भारतीय संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांतीच्या पावन पर्वात रथसप्तमीपर्यंत ठिकठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधून जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुजींनी अनोखी शक्कल लढवित हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेच्या पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे आणि विद्यार्थींनींच्या पुढाकारातून शाळेतील माता पालकांचा पालक मेळावा आयोजित केला. या मेळाव्यास माता पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने लोप पावत चाललेली वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी महिलांना वाचनीय अशा पुस्तकांचे वाण म्हणून भेट देण्यात आले. यात राजमाता जिजाऊ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महानायिका अहिल्याबाई होळकर, संतांचे विचार, महात्मा फुले तसेच इतर संस्कारक्षम अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच कमलबाई शिखरे ह्या होत्या तर माता पालकांसह अनेक मातांची यावेळी उपस्थिती होती.
हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांनी अनोखी शक्कल लढवित माता पालकांना वस्तूरुपी वाणाच्या ऐवजी पुस्तकांचे वाण भेट दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे यांनी महिलांना तिळगुळ दिले. महिलांनी एकमेकांचे हळदी कुंकवांनी औक्षण करून आपल्या सौभाग्याविषयी मंगल कामना व्यक्त केल्या. तसेच आपल्या पाल्यांच्या शालेय गुणवत्तेबरोबरच इतर विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. तदनंतर महिलांसाठी काही मनोरंजक खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनल गोडबोले, मयुरी गोडबोले, तेजल शिखरे, सुप्रिया गच्चे, अनन्या टिमके, शालीनी हाटकर, सपना हाटकर, विद्या गोडबोले यांनी परिश्रम घेतले.
