उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चितेची राख अजून पूर्णपणे शांतही झालेली नाही, आणि त्याआधीच सत्तेच्या हव्यासाने अंध झालेल्या राजकारणाने आपला खरा चेहरा उघडा पाडला आहे. आज सायंकाळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची घाई सुरू आहे. आमचे हे विश्लेषण प्रसारित होईपर्यंत त्यांनी शपथ घेतलेली नसेल, किंवा काही क्षणांत घेतील पण प्रश्न शपथेचा नाही, प्रश्न आहे नीतीचा, संवेदनशीलतेचा आणि राजकीय अधःपतनाचा.
सन २०१९ च्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून शरद पवार संपले अशी गर्वोक्ती केली होती. त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा स्पष्ट होता शरद पवार यांचे नाव आणि अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणातून पुसून टाकणे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे, कुटुंबात फूट पाडणे आणि पक्षाला दिशाहीन करणे, याशिवाय दुसरी कोणतीही नीती या राजकारणामागे नव्हती.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. उपस्थित ४० आमदारांपैकी ३८ आमदारांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यास पाठिंबा जाहीर केला. जो पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी आणि संस्कृतीचा रक्षक म्हणवतो, त्यांना इतकेही कळले नाही का की शोककाळात किमान बारा दिवस थांबणे ही भारतीय परंपरा आहे? धार्मिक विधी, कौटुंबिक संस्कार पूर्ण होऊ द्यावेत, त्यानंतरच राजकीय हालचाली व्हाव्यात ही साधी जाणही हरवली आहे.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर हा निव्वळ अपघात आहे” असे सांगितले. अनेकांना यामागचे राजकारण समजले नाही. पण दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेथे येणार होते. लाखो लोकांचा रोष उफाळून आला असता. तो रोष थोपवण्यासाठीच शरद पवारांनी संयमाची भूमिका घेतली हा तपशील मुद्दाम दुर्लक्षित केला जात आहे.
अजित पवार यांच्या अस्थी संकलनानंतर एक मुलगा मुंबईकडे गेला, तर दुसरा मुलगा जय पवार आजोबा शरद पवार यांच्यासोबत तासन्तास चर्चा करत होता. पण या सगळ्या भावनिक दृश्यांच्या आड एक वेगळाच खेळ सुरू होता. आज वास्तव असे आहे की अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष गुजराती हस्तकांद्वारे चालवला जात आहे. अमित शहांच्या सांगण्यावरून प्रफुल्ल पटेल निर्णय घेत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. या नेत्यांवर आजही कायदेशीर खटल्यांची टांगती तलवार आहे. सत्ता म्हणजे संरक्षण, ही उघड वस्तुस्थिती आहे.
आज महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते निधीशून्य नव्हे, तर नीतीशून्य आहे. राजकारण, समाज आणि जीवन या तिन्ही क्षेत्रांत नीती आवश्यक असते. पण सध्या महाराष्ट्रात सत्तेसाठी कोणतीही मर्यादा उरलेली नाही. राजकीय विश्लेषक निरंजन टकले यांच्या मते, विलीनीकरणानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री राहतील आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, असा आराखडा होता. मात्र शरद पवार यांनी स्पष्ट केले की आज जे काही घडते आहे, ते अजित पवार यांच्या इच्छेविरुद्ध असून सर्व सूत्रे प्रफुल्ल पटेल यांच्या हातात आहेत. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मग प्रश्न उभा राहतो सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव काय? एक लोकसभा निवडणूक लढवली आणि पराभव स्वीकारला. त्यानंतर भाजपने राज्यसभेत पाठवले. तीन अधिवेशनांत त्या केवळ प्रेक्षक होत्या. आज त्याच व्यक्तीला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर बसवले जात आहे. हा निर्णय अनुभवावर आधारित आहे की राजकीय सौदेबाजीवर?
हा सगळा खेळ पुन्हा एकदा शरद पवार यांना संपवण्याचा आहे. अजित पवारांची रिक्त जागा सुनेत्रा पवारांनी भरायची, त्या बिनविरोध निवडून याव्यात, आणि राज्यसभेची जागा पार्थ पवारांना असा हा नियोजित डाव आहे. २०१९ मध्ये ज्याच्यावर भाजपने घराणेशाहीचा आरोप केला, त्याच पार्थ पवारांना आज राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. घराणेशाही फक्त गांधींसाठी? मग मेनका गांधी, वरुण गांधी यांना तो नियम लागू होत नाही का? हा भाजपचा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे.
काही जण राजीव गांधींचे उदाहरण देतात. पण पंतप्रधानपद हे संवैधानिक आहे; उपमुख्यमंत्रीपद नाही. ते पद काही महिने रिक्त राहिले असते तरी राज्यघटनेला धक्का बसला नसता. मग ही घाई कशासाठी?
अडाणी पवार भेटी, दिल्ली–मुंबई–बारामती फेऱ्या, उद्घाटनात “गौतम अडाणी माझा भाऊ आहे” अशी विधाने\ हे सगळे योगायोग नाहीत. मात्र अजित पवार यांच्या अंत्यविधीला गौतम अडाणी अनुपस्थित होते, हा विरोधाभासही तितकाच बोलका आहे.
आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांच्या भविष्यावर अंधार आहे. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असती, तर अनेक नेते भाजपसोबत गेलेच नसते. तरीही हे सत्य आहे की शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी, सर्वसमावेशक नेतृत्व आहे—कृषीपासून संस्कृतीपर्यंत त्यांचा अभ्यास अतुलनीय आहे. अशा नेत्याला संपवणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेलाच घाव घालणे.
“संकटात संधी शोधा” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य आज महाराष्ट्रात विकृत स्वरूपात अंमलात आणले जात आहे. महाराष्ट्र संकटात असताना भाजप संधी शोधत आहे. संविधानाचे वाभाडे काढणारी विधेयके संसदेत मांडली जात आहेत. ही दिशा देशाला कुठे घेऊन जाणार आहे हे ठरवण्याची वेळ आता जनतेवर आली आहे.
नांदेडमध्ये आज सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत हॉल खचाखच भरलेला होता. अजित पवार यांच्या आठवणींनी वातावरण भारले होते. पण दुर्दैव असे की, ज्यांची आठवण आज डोळे पाणावते, त्यांच्याच मूल्यांना आजचे राजकारण पुसून टाकत आहे. हेच या काळाचे सर्वात भीषण वास्तव आहे.
