देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला परंतु दोनच दिवसांनी २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. हा अपघात इतका भयंकर होता की अनेक स्फोट झाले आणि विमानातील सर्वचजण भाजून निघाले. काही जणांचे अवयव इतस्ततः पसरले होते. बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी ८.४४ वाजता हा अपघात झाला.
या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला. सकाळी परिसरात दाट धुके होतं. विमानाने दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात असताना हा भीषण अपघात झाला. ही फार मोठी दुर्घटना असून महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. हे विमान बारामती एमआयडीसीतील विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजणच शोकसागरात बुडाले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांना शोक अनावर झाला. अनेक ठिकाणी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजिततदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते. त्यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्याआधीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे होते. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, ते पाचवेळा या पदावर होते. २०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली होती. संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले. महाराष्ट्रात २८ जानेवारी रोजी सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि २८,२९ आणि ३० जानेवारी २०२६ रोजी या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. अजित पवारांचं पार्थिव २८ रोजीच सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी सकाळी ९ नंतर गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघाली गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अलोट गर्दीच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. राज्यासह देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. नाशिकमध्येही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी वनकर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यामुळे महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी जागेवरुनच गिरीश महाजन यांना जाब विचारला. माधवी जाधव यांनी यावेळी चांगलाच संताप व्यक्त केला. आपल्याला निलंबित केलं तरी चालेल मात्र कुणालाही घाबरणार नाही, असा पवित्रा माधवी जाधव यांनी घेतला. यावेळी माधवी जाधव यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दुसरीकडे घेऊन जाताना दिसले. पण त्या आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व वादावर अखेर गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. मात्र, गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेवरही टीकेची झोड उठली.
बाबासाहेब संविधानाला कारणीभूत आहेत. त्यांना तुम्ही संपवायला निघालेत. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी याची माफी मागणार नाही. पण पालकमंत्र्यांनी त्यांचीही चूक पदरात घ्यावी. मॅडम मला मीडियाशी घेणंदेणं नाही. मला निलंबित केलं तरीही मी वाळूच्या गाड्या उपसेन. मी माती काम करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही”, अशी भूमिका माधवी जाधव यांनी मांडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की मला निलंबित करायचं तर करु शकता. मॅडम, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्रीसुद्धा संविधानामुळेच आहेत. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमचे कान आतुरले होते. आत्तातरी बाबासाहेबांचं नाव भाषणात येईल. जो संविधानाला कारणीभूत आहे, जो प्रजासत्ताक दिनाचा मानकरी आहे, त्यांचं नाव भाषणात का नाही?”, असा जाब माधवी जाधव यांनी विचारला. यावर प्रतिक्रिया देतांना महाजन म्हणाले की, मला खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी पुढाकार घेतो. नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये सहभागी असतो. मी चाळीस वर्षांत एकदाही असे केले नाही. मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी मी जातो, त्यांच्या लग्नकार्यात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा केला. लोक खुश आहेत, आता अनावधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे, असेही ते म्हणाले.
मंत्री गिरीश ममहाजनांच्या समर्थनात अनेक लोक मैदानात उतरले आहेत. महाजन हे किती चांगले आहेत हे सांगणारे व्हिडिओ पोस्ट करीत आहेत. त्यांनी किती जणांची कामे केली, किती रुग्णांना मदत केली, भीम जयंती मिरवणुकीसाठी किती पैसे दिले, हे सांगत आहेत. यावरही सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे. लोक म्हणतात की, कुणी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तिकीट मिळावे म्हणून ते बोलत आहेत. हे सरकारचे, भाजपचे, महाजनांचे गुलाम आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी आहेत असा दावा करीत आहेत. परंतु भीम जयंतीत नाचले, निळा शर्ट घातला, लेझीम खेळले किंवा ट्रॅक्टर चालवले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरतात हा महाजनांचा गोड गैरसमज आहे. महाजन म्हणतात की अनावधानाने बबाबासाहेबांचे नाव घेतले गेले नाही. हा गलथानपणा बाबासाहेबांच्याच बाबतीत का होतो? तो जाणिवपूर्वक केला असल्याचे माधवी जाधव यांनी म्हटले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण होते. तेथील पालकमंत्री भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख करतात का? नाही केल्यास तिथे कुणी माधवी जाधव असतात का? परंतु जिथे तिथे गुलामांचे जत्थे तयार झाले आहेत. यांना चीड येत नाही हाच मोठा गुन्हा आहे. माधवी जाधव यांना इतकी चीड आली की महाजनांनी दिलगिरी व्यक्त करुन चालणार नाही. त्यांनी माफीनामा लिहून दिला पाहिजे. ही फार मोठी गंभीर चूक आहे. ही चूक सहजासहजी सुधारल्या जाऊ शकत नाही. त्यांनी कुंभमेळ्यातल्या नदीत चारदा अंघोळ केली तरीही ते धुवून निघणार नाहीत. त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही झाला आणि त्यांनी माफीनामा नाही दिला तर याच ठिकाणी मी उपोषण करणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे. संघाच्या मुशीत वाढलेले महाजन जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संस्कार जोपासणारे आम्हीच आहोत, असा दावा करतात तेव्हा संघाची विचारधारा माहीत असलेले आंबेडकरी बुद्धीवादीही याकडे साशंकतेने पाहतात. मात्र, बाबासाहेबांना संपविण्याचे काम कुणीही करु शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे प्रखर आहे.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. 9890247953.
