अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात एका 70 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान घडल्याचा अंदाज आहे.
मृत महिलेचे नाव पार्वतीबाई प्रताप सूर्यवंशी (वय 70) असे असून त्या आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास दाभड शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर दगडाने मारहाण केल्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्याने हा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी मृत महिलेचे पुत्र गंगाधर प्रताप सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 40/2026 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेमकेवाड पुढील तपास करीत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
