आता आम्हीच बुलडोजर आहोत : प्रयागराज सोडून काशीला पोहोचलेल्या शंकराचार्यांची कडक घोषणा  

तीर्थराज प्रयाग येथे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तब्बल दहा ते बारा दिवस उपोषण करणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी माघ मेळा अर्धवट सोडून परतले आहेत. सध्या ते वाराणसी येथे वास्तव्यास आहेत. प्रशासनाने त्यांना स्नानासाठी अधिकृत पत्र दिले होते, पुष्पवृष्टी करण्याचे आमिषही दाखवले होते; मात्र स्वामीजींनी हे सर्व स्पष्ट शब्दांत नाकारत प्रशासनाच्या दिखावूपणावर ठपका ठेवला आणि प्रयागराज सोडले.

परतताना त्यांनी ठाम शब्दांत जाहीर केले की ही लढाई थांबलेली नाही, तर अधिक तीव्र होणार आहे. आता आम्ही स्वतः बुलडोजर झालो आहोत, असे सांगत त्यांनी गोवंशहत्या करणाऱ्यांना थेट इशारा दिला. जो गोहत्या करेल, त्याच्यावर बुलडोजर चालेल, अशी कडक भूमिका त्यांनी मांडली. यूजीसीचे नवीन नियम हे हिंदू धर्माला फोडण्याचे, सनातनाला तुकडे-तुकडे करण्याचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महाकुंभातील कथित घटनांबाबत बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. एकही पोलीस निलंबित झाला नाही, कोणतीही चौकशी झाली नाही, आणि न्याय तर दूरच राहिला, असे त्यांनी ठणकावून सांगितले. माझ्याकडून चूक झाली, असे मान्य करायला कोणीही तयार नाही, हीच या व्यवस्थेची खरी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. आता पुढील लढ्याची रणनीती ठरवून ती अधिक तीव्र केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यूजीसीच्या नियमांवर बोलताना स्वामीजी म्हणाले की एकाच समाजातील लोकांना एकमेकांसमोर उभे करून भांडणे लावण्याचा हा डाव आहे. एका जातीला दुसऱ्या जातीसमोर उभे केले, तर नुकसान दोघांचेही होईल. हा हिंदू धर्म संपवण्याचा रस्ता असून, असा कायदा देशात आणला जाऊ शकत नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या घोटाळ्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे असे अजित पवार यांनी सांगितले आणि त्यानंतर ही घटना घडली, त्यामुळे संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही चौकशी मी वैयक्तिक मागत नाही; मात्र जनतेच्या मनातील शंका दूर करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या सनातनचा मान न राखणारी सत्ता पुन्हा सत्तेत येत नाही या वक्तव्यावर टीका करताना स्वामीजी म्हणाले की भाषणांत मोठमोठे शब्द वापरले जातात, पण प्रत्यक्षात जनतेच्या हिताचे काहीच घडत नाही. शब्द आणि कृती यातील दरी आज प्रचंड वाढली आहे.

प्रयागराजमधील घटनेवर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट केले की यज्ञ पूर्ण आहुतीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अनिष्ट घडले असे अखिलेश यादव यांना वाटणे साहजिक आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या पाठवले तर जाईन या विधानावर टीका करत स्वामीजींनी तुमच्याकडे स्वतःचा विवेक नाही का? असा थेट सवाल उपस्थित केला. विवेकशील व्यक्ती आदेशाची वाट न पाहता स्वतः निर्णय घेत असते, असेही ते म्हणाले.

चारही शंकराचार्यांशी चर्चा करून गोहत्येविरोधातील आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पीडीआयनेही सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे नमूद केले आहे. भाजपकडून न्यायाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे, असा थेट आरोप स्वामीजींनी केला. संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली असून ही हुकूमशाही असल्याचा कठोर शब्दांत निषेधही त्यांनी नोंदवला.

या सर्व वक्तव्यांवरून स्पष्ट होते की शंकराचार्यांची लढाईची जागा बदलली असली, तरी लढा थांबलेला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून संविधानाने चालतो. धर्माच्या नावाखाली राजकारण करण्यास संविधान मान्यता देत नाही. धर्माची पताका खांद्यावर घेऊन सत्तेत बसलेले लोक ना संविधानाशी प्रामाणिक राहू शकतात, ना धर्माशी न्याय करू शकतात हीच आजच्या परिस्थितीची कटू वस्तुस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!