एसटी मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व ; 31 जानेवारी 2026 सेवापुर्तीच्या निमित्ताने

नांदेड –   समाजामध्ये अनेक व्यक्ती जन्माला येतात आणि आपली नौकरी, उद्योगधंदे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून सर्वसामान्य जीवन जगत असतात. परंतु काही मानसं आपल्या नियमित दिनचर्येतून आपण समाजाचं काही देणे लागतो या उदांत भावनेतून समाजासाठी काही तरी करून दाखवण्याची खूनगाठ उराशी बाळगून जिद्दीने एक विचारधारा घेवून आपले जीवन जगत असतात. आणि आपल्या कार्य कर्तत्वाने समाजामध्ये एक आगळी-वेगळी छाप दाखवून सतत जनतेच्या मनात घर करून राहतात. अशाच प्रकारे एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत हणमंतराव मिसलवाड यांचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या सिमावर्ती भाग म्हणजेच मुळ गावापासून 1 किलो मीटरवर कर्नाटक राज्याची सिमा तर 20 किलो मीटरवर आंध्र तेलंगणाची सिमा असलेल्या अतिदुर्गम भागात वसलेल्या मौ.कबीरवाडी, पो.वझर, ता.देगलूर, जि.नांदेड येथे 1968 मध्ये एका गरीब सामान्य शेतकरी कुटूंबामध्ये व आदिवासी कोळी महादेव जमातीमध्ये त्यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मौजे कबीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1 ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण झाले. तर माध्यमिक शिक्षण लालबहाद्दूर शास्त्री विद्यालय वझर या संस्थेमध्ये 5 वी ते 10 वी चे शिक्षण येथे झाले. त्यांनी आपल्या शालेय जीवनात गॅदरिंग, नाटके, गणपती उत्सव, देवी उत्सव, मोहरम ताजीया, भारूड व गौळण म्हणणे, पोथी वाचणे अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेवून आपल्या अंतर्गत असलेल्या कला गुणांची उकल केली. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे नांदेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये  (आयटीआय) मोटार मेकॅनिकल हा कोर्स पुर्ण करून सेवा योजन कार्यालय नांदेड यांच्याकडून ते 1989 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) नांदेड विभागाच्या एसटी डेपो नांदेड आगारात ते प्रवासी सेवेमध्ये मेकॅनिक म्हणून रूजू झाले. त्यांनी आपली सेवा नियमीत करीत असतांना एसटी आगारातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग योगदान असून त्यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरूषांच्या कार्य विचाराने प्रेरीत होवून समाजामध्ये, कामगार क्षेत्रातील चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय तन-मन-धनाने सहभाग राहिलेला असून अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक, कामगार संघटन आदी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, अस्थापनेच्यावतीने तीन वेळा उत्कृष्ट कामगार पुरस्कार, कामगार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा अशोक लेलँड प्रा.लि. कंपनीचा हाईमायलेज अवॉर्ड, दैनिक वृत्त महानगरचा उत्कृष्ट कामगार राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्यावतीने मान्यवर काशीरामजी यांच्या नावे सामाजिक प्रेरणा पुरस्कार, दैनिक वीरशिरोमणी, दैनिक नंदगिरीचा कानोसा, मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मान नेतृत्वाचा-सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगार जीवन गौरव पुरस्कार, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान ता.उमरी (ग्रामीण भागातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार) यांच्यावतीने तंत्रज्ञानरत्न राज्यस्तरीय पुरस्कार व आदिवासी कोळी महादेव जमात नांदेड जिल्हा समाज भूषण पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांच्या उल्लेखनिय कार्य योगदानाबद्दल त्यांना प्राप्त झालेले आहेत.
37 वर्षाच्या एसटी प्रवासी सेवेतून जरी निवृत्त होत असलो तरी महापुरूषांचे कार्य विचार घेवून सामाजीक आणि बहुजन चळवळीतून कधीही मी निवृत्त होणार नाही असे ते सांगतात. 31 जानेवारी 2026 शनिवार रोजी होत असलेल्या सेवानिवृत्तीबद्दल (सेवापूर्ती) त्यांना पुढील भावी कार्यास व आयुष्यास खूप-खूप हार्दिक शुभेच्छा.

लेखक – भय्यासाहेब गोडबोले 
पत्रकार,नांदेड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!