ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर
येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित
छत्रपती संभाजीनगर – सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे.
एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय.
नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. देश विदेशातील भाविक याठिकाणी येणार आहे. त्याअनुषंगाने गुरु तेग बहादुर यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे.
याबाबत भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाराचे सदस्य सरदार हरिसिंग यांनी माहिती दिली. त्यानुसार, ‘जफर नामा’ म्हणजे विजयाचे पत्र. मुगल बादशाह औरंगजेब याने शिखांवर अनन्वित अत्याचार केले. त्याविरोधात हे एक प्राणांतिक आंदोलन होते. जिझिया करा द्वारे अन्य धर्मियांचे कर रुपात शोषण होत होते. त्यास प्रतिकार करणाऱ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागे. त्यासाठी गुरु तेग बहादुर यांनी आपल्या शिष्यांसह शहादत दिली. तो एक मोठा रोमांचक इतिहास आहे. शिखांची बलिदानाची परंपरा अधोरेखित करणारी ही घटना होय.

त्याच गुरु तेग बहादुर यांचे पुत्र गुरु गोविंदसिंह यांनी याबाबत औरंगजेबाला पत्र लिहिले. हे पत्र जफरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. या पत्राचे महत्त्व खूप आहे. हेच ते पत्र जे औरंगजेबाच्या कृत्यांची श्वेत पत्रिका म्हणूनही ओळखले जाते. हे पत्र वाचून औरंगजेबाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्यानंतर त्याने अन्याय अत्याचाराला चालना देणारे कायदे रद्द करण्याचे फर्मान जारी केले. या शिवाय गुरु गोविंदसिंगांना पकडण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. त्यांना त्रास देऊ नये त्यांना सहाय्य करावे, असेही हुकूम जारी केले. इतकेच नव्हे तर त्याने गुरु गोविंदसिंग यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र ही त्याची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. कारण ही घटना इ.स. १७०७ मधिल आहे. हेच वर्ष औरंगजेबाच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष ठरले.
जफरनामा आणि छत्रपती संभाजीनगरचे अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. हे पत्र गुरु गोविंदसिंगांनी लिहिल्यानंतर ते औरंगजेब पर्यंत पोहोचवायचे होते. त्यावेळी औरंगजेब मराठा साम्राज्याचा बिमोड करण्याच्या इच्छेने महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता. गुरु गोविंद सिंग यांचे दोन शिष्य भाई दयासिंग आणि भाई धरमसिंग हे पत्र घेऊन औरंगजेबाचे दक्षिणेतील महत्त्वाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला (त्यावेळचे औरंगाबाद) आले. येथे येऊन त्यांनी मुगल बादशाहच्या भेटीचा प्रयत्न केला. नेमका त्यावेळी औरंगजेब बादशाह अहिल्यानगर (त्यावेळचे अहमदनगर) मुक्कामी होता. या दोघां शिष्यांनी इथूनच अहमदनगरकडे कूच केले. औरंगजेबाला भेटून आपल्या गुरुंचे पत्र सुपूर्द केले.

फार्सी भाषेत व लिपीत हे पत्र छंदबद्ध काव्य पद्धतीने लिहिले आहे. त्यात शिखांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराचे वर्णन आहे आणि काहीही झाले तरी आम्ही अन्याय सहन करणार नाही असा निर्धारही आहे.एखाद्या संताने राज्यकर्त्याला खडे बोल सुनावले आहेत. हे पत्र अर्थात जफरनामा औरंगजेबाने वाचला. वाचून त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. आपल्या आयुष्याच्या अखेरीची चाहूल त्याला लागली होती. त्याने तात्काळ फर्मान जारी करुन सर्व अत्याचार थांबविण्याचे आदेश दिले.
हे पत्र शीख धर्माच्या पवित्र अशा दशमग्रंथ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे. आजही छत्रपती संभाजीनगरच्या धावणी मोहल्ला, शहागंज येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग या गुरुद्वाऱ्यात संग्रहित ठेवण्यात आले आहे. हे पत्र आजही पाहता येते. विशेष म्हणजे हाच गुरुद्वारा दक्षिण भारतातील पहिला गुरुद्वारा मानला जातो. देशभरातील भाविक येथे माथा टेकण्यासाठी आवर्जून येतात, अशी माहिती या गुरुद्वाराचे सदस्य सरदार हरिसिंग यांनी दिली.
