विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान 

मुख्य संयोजकपदी शिवाजीराव गावंडे ; राज्य संघटकांची पत्रकार परिषदेत घोषणा

नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व राहुल एस. एम. प्रधान यांची, तर मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीतील यशवंत मकरंद, डॉ. भारत शिरसाठ, अनंत भवरे , स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, शिवाजीराव गावंडे, डॉ. अनंत राऊत , प्रा. प्रबुद्ध चित्ते , संतोष आगबोटे, नितीन एंगडे , आसावरे, प्रसेनजीत मांजरेकर, प्रकाश इंगोले , राहुल जोंधळे , दिनेश लोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संविधानाचे ज्येष्ठ अभ्यासक व कादंबरीकार डॉ. अनंत राऊत यांची कोषाध्यक्षपदी, नांदेड येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे यांची मुख्य समन्वयकपदी, तर कवी तथा माध्यम अभ्यासक डॉ. राजेंद्र गोणारकर यांची विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या मुख्य निमंत्रकपदी निवड करण्यात आली असल्याचे ढमाले यांनी यावेळी स्पष्ट केले.

संमेलनाचे स्थळ, दिनांक तसेच संमेलनाध्यक्ष याबाबत लवकरच स्थानिक नियोजन समितीमार्फत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नांदेड नगरीत होणारे हे साहित्य संमेलन सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता, परस्पर स्नेहभाव आणि समतेचा प्रवाह अधिक व्यापक करणारे ठरेल. विद्वेष व हिंसेच्या प्रवृत्तीच्या विरोधात भूमिका मांडणारे हे संमेलन असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्यप्रेमी, रसिक व कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

दरम्यान , स्वागत अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल प्रधान म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,छत्रपती शाहू महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नेहमीच चळवळ गतिमान करण्यात आली आहे. मराठवाडा ही सामाजिक क्रांतीची भूमी राहिली आहे. त्यात नांदेडचे योगदान मोठे राहिले आहे. या चळवळीच्या माहेर घरात विद्रोही साहित्य संमेलन होत आहे . ही नांदेडकरणासाठी भूषणावह बाब आहे. हे साहित्य संमेलन ऐतिहासिक व्हावे यासाठी आमचे परिपूर्ण प्रयत्न असतील . देशभरातून पुरोगामी चळवळीतील , विद्रोही साहित्यिक , वाचक , साहित्यप्रेमी सहभागी होतील. किमान दहा हजार नागरिक या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!