नांदेड जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यास सुरुवात

नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन

नांदेड –  बालविवाह मुक्त भारत, महाराष्ट्र आपला संकल्प १०० दिवस अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय व अशासकीय अधिकारी-कर्मचारी, समाजसेवी संस्थांचे कर्मचारी, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सुजाण नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी https://stopchildmarriage.wcd.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा (Pledge) घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर स्वतःचे नाव व जिल्हा निवडून प्रतिज्ञा घेतल्यानंतर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येणार असून, याद्वारे बालविवाह मुक्त भारत अभियानात आपला सहभाग नोंदविता येईल. प्रतिज्ञा घेण्यासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

संकेतस्थळावरील Menu वर क्लिक करून Take Pledge हा पर्याय निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव व मोबाईल क्रमांक टाकावा. राज्य म्हणून महाराष्ट्र व जिल्हा म्हणून नांदेड निवडावा. भाषा (हिंदी/इंग्रजी) निवडून कॅप्चा कोड भरावा. प्रतिज्ञा वाचून शपथ घ्यावी व प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

बालविवाह प्रतिबंधासाठी सर्व स्तरातून व्यापक सहभाग आवश्यक असून, नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!