नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन ; शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
हिंगोली – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५-२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास, धर्मासाठी दिलेले महान बलिदान तसेच समाजासाठी केलेले अमूल्य कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड येथे ऐतिहासिक, भव्य व दिव्य ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी येथील मोदी मैदान (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यारंच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृती मोहीमेमध्ये १५ ते २३ जानेवारीदरम्यान प्रभातफेरीचे आयोजन, २५ जानेवारीपर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : ‘हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादूर’चे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी केले आहे.
जिल्ह्यात 15 ते 17 जानेवारीदरम्यान तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
नागरिकांनी सोशल मीडियावर #हिंद दी चादर 350 (#hinddichadar350) या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट शेअर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (योजना) आणि स्थानिक पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. आज जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून श्री गुरु तेग बहादूर यांच्यावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच निबंध स्पर्धांमध्येही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
