शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक  चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण

नवी दिल्ली, 15  : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष ‘अॅट होम’ स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे 250 विशेष व्यक्तींना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणांमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील सगुणा बाग चे संस्थापक आणि कृषिरत्न श्री. चंद्रशेखर हरि भडसावळे यांचाही समावेश आहे. शेती, नैसर्गिक शेती, शून्य-नांगरणी तंत्र, जलसंवर्धन , कृषी पर्यटन  आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळातील अथक प्रयत्न आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हे विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.

चंद्रशेखर भडसावळे हे 1976 पासून शेती करत असून, त्यांनी आपल्या सगुणा बाग ला (नेरळ, जिल्हा रायगड) एक आदर्श एकात्मिक शेती, मत्स्यव्यवसाय, वनशेती, फलोत्पादन, गाई-गुरांचे संगोपन आणि पर्यटन यांचा समावेश असलेले मॉडेल बनवले आहे. हे ठिकाण आज देशभरातील शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी शिक्षण आणि प्रेरणास्थळ बनले आहे. त्यांच्या कार्याने शेतकऱ्यांना सन्मान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यात मोठा वाटा आहे.राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ समारोह हा प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर होणारा एक प्रतिष्ठित कार्यक्रम असून, यात देशातील विविध क्षेत्रांतील विशेष अतिथींना आमंत्रित केले जाते. यंदा उत्तर-पूर्व भारतातील (अष्टलक्ष्मी राज्ये) हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!