शिख परंपरेतील शस्त्रसंस्कृती : धर्म, शौर्य आणि सेवाभावाचा उत्सव
नांदेड येथे येत्या 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य शासनाचे मंत्री उपसि्थत राहणार आहेत. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बाहदूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या मुख्य कार्यक्रमाला शीख सिकलीगर, बंजार, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजाचे धर्मगुरु उपसिथत राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला सर्व समुदायाला भाविक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जगभरातून 10 लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यादृष्टीने राज्य शासन, नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे.
शिख उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून, ते शिख इतिहास, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा सामूहिक उत्सव आहे. या उत्सवांमध्ये कीर्तन, लंगर, सेवा यांसोबतच शिख समुदायाची शस्त्रसंस्कृती विशेषतः अधोरेखित होते. तलवार, कृपाण, चक्र, भाला यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे ही शिख परंपरेत केवळ युद्धसाधने नसून, ती धर्मरक्षण, आत्मसन्मान आणि मानवतेच्या सेवेसाठी सज्ज राहण्याची प्रतीके आहेत.
शिख धर्मात शस्त्रसंस्कृतीचा उद्गम
शिख धर्माचे संस्थापक श्री. गुरु नानक देवजी यांनी शांतता, समता आणि सत्य यांचा संदेश दिला. मात्र समाजातील वाढते अन्याय, अत्याचार आणि धार्मिक छळ पाहता पुढील गुरूंनी संरक्षणासाठी शस्त्रधारणेचा मार्ग स्वीकारला. सहावे गुरु श्री. गुरु हरगोबिंद साहिब यांनी ‘मिरी–पीरी’ संकल्पना मांडून आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारली. याच काळात शिख समाजात शस्त्रसंस्कृतीचा औपचारिक आरंभ झाला.
शस्त्र म्हणजे आक्रमण नव्हे, तर संरक्षण
शिख परंपरेत शस्त्र उचलणे म्हणजे आक्रमण नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणे होय. शस्त्रधारणा ही नैतिक जबाबदारी आहे—निरपराधांचे रक्षण करणे, अत्याचार थांबवणे आणि धर्मस्वातंत्र्य टिकवणे होय. ही भूमिका शिख धर्माला इतर धर्मांपेक्षा वेगळी आणि अधिक मूल्याधिष्ठित बनवते.
ऐतिहासिक शस्त्रे आणि त्यांचे प्रतीकात्मक अर्थ शिख उत्सवांमध्ये प्रदर्शित केली जाणारी ऐतिहासिक शस्त्रे त्यांच्या प्रतीकात्मक अर्थामुळे विशेष महत्त्वाची ठरतात. तेग (तलवार) : अन्यायाचा प्रतिकार आणि धैर्य, कृपाण : न्याय, करुणा आणि संरक्षण, चक्र (चक्रम) : सज्जता, शिस्त आणि युद्धकौशल्य, भाला/बर्छा : जागरूकता आणि सामूहिक सुरक्षा, धनुष्य-बाण : संयम आणि अचूकता, या शस्त्रांचा उपयोग करताना नैतिकता आणि संयम पाळणे ही शिख परंपरेची खास ओळख आहे.
श्री. गुरु तेग बहादूर साहिब : शस्त्रांपलीकडील शौर्य
शिख धर्माचे नववे गुरु श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांनी शस्त्रांचा उपयोग न करता, बलिदानाच्या शौर्याने धर्मस्वातंत्र्याचे रक्षण केले. त्यांच्या नावातील ‘तेग’ ही तलवार नसून, न्यायासाठी उचललेली नैतिक धार होती. त्यांच्या शहादतीमुळे शिख शस्त्रसंस्कृतीला नैतिक अधिष्ठान मिळाले.
खालसा पंथ आणि शस्त्रसंस्कृतीचा उत्सवी आविष्कार
1699 मध्ये श्री. गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. यानंतर शस्त्रधारणा ही शिख ओळखीचा अविभाज्य भाग बनली. पंच ककारांपैकी कृपाण ही केवळ शस्त्र नसून, ती सदाचार, सेवा आणि सज्जतेचे प्रतीक आहे. शिख उत्सवांमध्ये निहंग शस्त्रप्रदर्शन, गटका (शस्त्रकला) प्रात्यक्षिके, शस्त्रांची पूजा व सन्मान, या माध्यमातून परंपरा जिवंत ठेवली जाते. शस्त्रसंस्कृती आणि सेवाभाव शिख शस्त्रपरंपरा सेवाभावाशी घट्ट जोडलेली आहे. ‘देग तेग फतेह’ हा मंत्र याच तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. देग (लंगर, सेवा) आणि तेग (संरक्षण) या दोन्हींचा समतोल म्हणजेच शिख जीवनदृष्टी होय.
आजच्या काळातील शिख उत्सव आणि संदेश
आजच्या शांततामय समाजात शस्त्रांचा प्रत्यक्ष उपयोग मर्यादित असला, तरी शिख उत्सवांमधील शस्त्रसंस्कृती ही स्वाभिमानाची जाणीव करून देते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देते. शांतता ही सामर्थ्यावर आधारित असते, हे अधोरेखित करते. शिख उत्सवांमध्ये शस्त्रांचे दर्शन हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून, ते धर्म, शौर्य आणि सेवाभावाचा उत्सव आहे. शिख शस्त्रसंस्कृती आपल्याला शिकवते की शक्ती ही विध्वंसासाठी नव्हे, तर न्याय, संरक्षण आणि मानवतेच्या सेवेसाठी असावी.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
