मैत्रीचा मुखवटा, पाठीत खंजीर : चीनचे अतिक्रमण, सत्ताधाऱ्यांचे मौन आणि भारताच्या सुरक्षेवरचा थेट हल्ला

७५ किमी रस्ता, ५६ इंची मौन : चीनसमोर झुकलेली सत्ता  

चीनचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट सातत्याने दिसते मैत्रीचा मुखवटा घालायचा आणि पाठीत खंजीर खुपसायचा. फरक इतकाच की पूर्वी चीन हे सगळे लपूनछपून करत होता, आणि आज ते खुलेआम, निर्लज्जपणे करत आहे. प्रश्न असा आहे की चीनला आज इतका माज आला कुठून?

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे तब्बल ६१ सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात येते, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटते, एवढेच नव्हे तर आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन आदरातिथ्य स्वीकारते. आणि याच काळात, त्याच वेळी, चीन भारतीय भूमीवर अतिक्रमण करत असतो. हा केवळ योगायोग आहे का? की हा जाणीवपूर्वक आखलेला विश्वासघात आहे?

ज्या दिवशी चीनचे कम्युनिस्ट नेते आरएसएस कार्यालयात चहा पित होते, त्याच दिवशी लडाखजवळील शक्सगाम खोऱ्यात चीनचे सैन्य घुसले आणि रस्ता बांधकाम सुरू झाले. तो रस्ता एखाद्या गावापर्यंत जाणारा नाही तो थेट ७५ किलोमीटर लांबीचा लष्करी रस्ता आहे. हा रस्ता पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या अगदी शेजारी जातो, जिथे पाकिस्तान आपले सैन्य आणि संरचना वाढवत आहे. म्हणजे एकीकडे चीन, दुसरीकडे पाकिस्तान आणि मध्ये भारताची सार्वभौमता चिरडली जात आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालय निर्ढावल्यासारखे सांगते, “ही जमीन आमची आहे. आम्ही इथे रस्ता बांधणारच.” प्रवक्त्या माओ निंग ठामपणे सांगतात की ज्या भागावर भारत दावा करतो, तो भाग चीनचाच आहे आणि तिथे चीन हवे ते इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहे. सियाचीनमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने उभे असताना, त्याला लागूनच शक्सगाम व्हॅलीमध्ये चीन निर्भयपणे रस्ते बांधतो, सैन्याची वाहतूक करतो, गाड्या चालवतो.

 

आणि भारत?
भारताचा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गप्प.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प.
गृहमंत्री अमित शाह गप्प.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प.

हा मौन कुणासाठी आहे? देशासाठी की चीनसाठी?

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा मुद्दा सहा वर्षांपूर्वीच उपस्थित केला होता. त्यांनी चीनमध्ये जाऊन व्याख्यानात सांगितले, भारताच्या संसदेत सांगितले. पण त्यावेळी त्यांची खिल्ली उडवली गेली. पंतप्रधान संसदेत उभे राहून म्हणाले, “कोणी आले नाही, कोणी गेले नाही.” आज काय स्थिती आहे? ७५ किलोमीटरचा रस्ता उभा राहिलेला आहे. अतिक्रमण वाढतच आहे.

स्वामी आजही ठामपणे सांगतात नरेंद्र मोदींना सर्व माहिती आहे, पण ते चीनला चिडवायला तयार नाहीत. का? कारण चीनकडे काहीतरी असे आहे की ज्यामुळे मोदींची पोलखोल होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. स्वामींच्या मते मोदी चीनकडून प्रचंड दबावाखाली आहेत.

या रस्त्याला चीनने “ऑल वेदर रोड” असे नाव दिले आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने पाकिस्तानला ८० टक्के लष्करी शस्त्रसाठा पुरवला आहे, आणि हाच रस्ता त्या पुरवठ्याचा कायमस्वरूपी मार्ग ठरणार आहे. हा आंतरराष्ट्रीय लष्करी मार्ग पीओकेमधून इस्लामाबाद, लाहोर होत ग्वादर पोर्टपर्यंत जाणार आहे पाकिस्तानसाठी ही थेट सुरक्षा जीवनरेषा आहे.

आणि दुसरीकडे, चीनचे कम्युनिस्ट नेते भारतात येऊन भाजपा नेत्यांशी हस्तांदोलन करत आहेत, आरएसएस कार्यालयात हसत-खेळत फोटो काढत आहेत. भारतीय सैन्याची ताकद, शौर्य, तयारी कोणत्याही बाबतीत चीनपेक्षा कमी नाही. मग जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत चीनसमोर का लोटांगण घालतो? भाजपा आणि आरएसएस चीनसमोर इतके नरम का?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दहापेक्षा जास्त वेळा चीनला गेले. त्या काळात चीनमधील भारतीय राजदूत कोण होते? आजचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर. त्या भेटींमध्ये नेमके काय ठरले, हे आजही गुपितच आहे. विशेष म्हणजे, जयशंकर यांच्या पत्नी चीनच्या आहेत हा केवळ योगायोग आहे का, की हितसंबंधांचा गुंता?

स्वामींचा आणखी गंभीर दावा म्हणजे सरसंघचालक मोहनजी  भागवत यांनीसुद्धा आता मोदींना बाजूला करण्याची गरज व्यक्त केली आहे. “तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, आता दुसरा कोणी तरी आणा जो चीनशी डोळ्यात डोळे घालून बोलेल,” असे मत त्यांनी मांडले, असे स्वामी सांगतात. मोदी आता ना आरएसएस ऐकतात, ना कुणाचे.

स्वामी स्पष्ट शब्दांत म्हणतात आज देशाचा खरा आजार नरेंद्र मोदी स्वतः आहेत. त्यांच्या परराष्ट्र दौऱ्यांवर, त्यांच्या मौनावर, त्यांच्या भीरूपणावर प्रश्नचिन्ह आहे. सहा वर्षांपूर्वी ज्यांची खिल्ली उडवली गेली, तेच स्वामी आज खरे ठरत आहेत. चीन ज्या पद्धतीने भारतीय भूमीवर अतिक्रमण करून रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे, त्यातून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला थेट आणि गंभीर धोका निर्माण झाला आहे. आणि तरीही सत्ताधारी शांत आहेत ही शांतता भयावह आहे, आणि हीच शांतता देशासाठी सर्वात मोठा धोका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!