नांदेड – “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंड (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या कालावधीत सदर ठिकाणी दरबार साहिब असणार असल्याने भाविकांना कार्यक्रमस्थळी अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, यासाठी दि. १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विशेष श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा श्रमदान उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक एकात्मता व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
