श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त; मैदानावर भव्य श्रमदान दोन हजार विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, दि. १२ जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (मोदी मैदान) येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सिख धर्माच्या मर्यादा व परंपरांचे पालन करून पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या कालावधीत सदर मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील सुमारे १,५०० विद्यार्थी, ॲकॅडमीचे ५०० विद्यार्थी  महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. श्रमदानाद्वारे मैदानावरील खडे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, तहसीलदार आनंद देवूळगावकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, रेडक्रॉसचे हर्षद शहा, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात खालसा हायस्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, नागार्जुना हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल यांसह पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध एनजीओ, सोल्जर ॲकॅडमी, तोटेवाड फिजिकल ॲकॅडमी, नांदेड फिजिकल व गरुडा फिजिकल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

या श्रमदानातून गुरुप्रती सेवा, समर्पण व प्रेमाची अनुभूती अनुभवास मिळाली. नांदेड येथे सिख धर्मियांचे एक महत्त्वाचे तख्त असल्याने या शहीदी समागम कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कार्यक्रमात विविध धर्म व समुदायांचे भाविक सहभागी होणार आहेत. तरी सर्वांनी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. येणाऱ्या भाविकांना अनवाणी चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी असर्जन परिसरातील मोदी मैदान पूर्णतः स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सेवाभावातून श्रमदान केले, याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!