स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा व मूल्यांचा प्रसार करणे, तरुणांना देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करणे तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे हा या दिनाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य, त्यांचे प्रेरणादायी विचार यावर प्रकाश टाकण्यासाठी मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय कीर्तनकार जी. बी. गिरोड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अत्यंत विनोदी, मार्मिक आणि प्रभावी शब्दांत प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाजप्रबोधनपर विचार मांडताना त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच चांगले विचार व सवयी अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी होते. कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षद शहा, उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक एस. जी. सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
