शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते.
श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे वैशाख कृष्ण पंचमी या पवित्र तिथीला झाला. बालपणी त्यांना त्यागमल या नावाने ओळखले जात होते. लहानपणापासूनच ते निर्भय, शूर, विचारशील व उदार स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण मीरी-पीरीचे स्वामी, गुरु-पिता श्री गुरु हरगोबिंद साहिबजी यांच्या छत्रछायेत झाले.
अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देत पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्याने प्रभावीत होऊन गुरु हरगोबिंद साहिबजी यांनी त्यांना ‘तेगबहादुर’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ ‘तलवारीचा धनी’ असा होतो. या काळात त्यांनी गुरुबाणी, धर्मग्रंथांचे अध्ययन तसेच अस्त्र-शस्त्रविद्या व घोडेस्वारीचे शिक्षण आत्मसात केले.
शीख (सिख) धर्माचे आठवे गुरु श्री गुरु हरिकृष्णजी यांची आत्मज्योति विसर्जित झाल्या नंतर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांची नववे गुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या गुरुपदाच्या कार्यकाळात संस्कृती रक्षक, सामाजिक समता, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्य यासाठी अखंड प्रयत्न केले.
17 व्या शतकामध्ये तत्कालिन शासन कर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुध्द आवाज उठवून मानवी हक्कांसाठी बलिदान देवून भारताच्या सांस्कृतिक व आध्यामिक अस्मितेचे त्यांनी रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक दृढ (मजबुत) झाली. त्यांच्या या त्यागामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘हिंद-दी-चादर’ ठरले.
गुरु तेगबहादुर साहिब जी यांच्या शिकवणीत क्षमा, करुणा, समता, प्रेम व मानवतेचा संदेश आहे. चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास क्षमा शक्य आहे, हा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी 15 रागांमध्ये रचलेले 116 शबद (गुरुबाणी) श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संकलित असून ते आध्यात्मिक प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे.
श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचे सन 2025 हे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहिती व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले योगदान स्मरण होण्यासाठी नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निशान साहिबांना चोला अर्पण करण्याची सेवा, श्री अखंडपाठ साहिब, कीर्तन, धार्मिक दीवान भरवण्यात येणार आहे. तसेच देशातील नामवंत रागी जत्थ्यांकडून शबद गायन होणार आहे.

त्यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ यावर्षी 350 वा शहीदी समागम वर्ष साजरा होत असून त्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी श्री तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. यापुर्वी नागपूर येथे हा कार्यक्रम 7 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. आता दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभाग, हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे मामा चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नांदेडच्या या कार्यक्रमानंतर नवी मुंबई येथे 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात येणार आहे.
या पवित्र प्रसंगी सिख धर्मीय बांधवांसह सर्व धर्मीय भाविक गुरु घरात उपस्थित राहून मत्था टेकणार असून श्रद्धा, भक्ती व ऐक्याचे दर्शन घडणार आहे. धर्म, मानवता व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या या महान गुरूंच्या स्मरणार्थ नांदेड येथे होणारा हा शहीदी समागम समाजाला सत्य, त्याग व साहसाचा संदेश देणारा ठरणार आहे.
-अलका पाटील
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
