समाजाच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारी व्यक्तिमत्त्वे विरळच असतात. न्याय, समता, निर्भीड विचार, कायद्याचे अभ्यासक सोबतच पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर अखंडपणे कार्य करणारे अॅड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे हे असेच एक बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव करणे नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्या एका विचारवंत कार्यकर्त्याच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासाचे दर्शन घडवणे होय.
१० जानेवारी रोजी शिरूर दबडे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे जन्मलेले नवनाथ भद्रे यांचे वडील चेअरमन गोविंदराव भद्रे व मातोश्री लक्ष्मीबाई गोविंदराव भद्रे होत. ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात जन्म झालेल्या नवनाथजींना लहानपणापासूनच जीवनातील प्रतिकूलतेचा सामना करावा लागला. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसंपत्ती आणि संघर्षमय परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. लहान वयातच वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवण्णा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसंपदेने त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव टाकला. हाच विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा पाया ठरला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात नवनाथजी भद्रे यांनी निर्भीड लेखणीचा ठसा उमटवला. दैनिक लोकपत्र, गाववाला, लोकनायक, अकोला दर्शन यांसह विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न स्पष्ट, तर्कशुद्ध आणि ठामपणे मांडले. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या जनतेचे प्रश्न असोत किंवा सामाजिक विषमता, जातिभेद, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरा असोत—प्रत्येक विषयावर त्यांनी निर्भयपणे लेखणी चालवली. त्यांची पत्रकारिता केवळ बातम्यांची मांडणी करणारी नसून समाजजागृती करणारी आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ठरली. लोकशाही मूल्यांचे रक्षण करीत सामान्य माणसाचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले.या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना मराठी पत्रकार संघाकडून ह्युमन राईट्स उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला यांसह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेसह विविध संघटनांकडून मान- सन्मान प्राप्त झाले. हि अभिमानास्पद बाब आहे.
“जो लड़े सच के लिए,
वो कभी हारता नहीं,
न्याय का सिपाही है,
वो कभी झुकते नही।”
कायद्याच्या जगात जिथे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक युक्तिवाद एखाद्याच्या आयुष्याची दिशा ठरवतो, तिथे काही व्यक्तिमत्त्वे केवळ वकील म्हणून नव्हे, तर न्यायाचे संरक्षक म्हणून ओळखली जातात. ॲड. नवनाथजी भद्रे त्यापैकीच एक नाव यांनी पत्रकारितेबरोबरच कायद्याच्या क्षेत्रातही वेळोवेळी त्यांनी समाजहिताची भूमिका घेतली. अॅडव्होकेट म्हणून त्यांनी कायद्याचा उपयोग केवळ व्यवसायापुरता मर्यादित न ठेवता तो सामाजिक न्यायासाठीचे प्रभावी साधन बनवले. वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन दिले. अन्यायाविरोधात उभे राहणे, लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि कायद्याच्या चौकटीतून समाजात सकारात्मक बदल घडवणे या बाबी त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग राहिले आहेत.
समाजसेवा हा नवनाथ भद्रे यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. कासा मनुष्यबळ विकास संस्था अंतर्गत ग्रामीण विकास कार्यकर्ता परिषदेमार्फत त्यांनी गोरगरीब, कष्टकरी, कामगार, महिला तसेच युवक-युवती यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कार्य केले. शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या कार्याची दखल घेत त्यांची गांधी–आंबेडकर संघटना जिल्हा संपर्कप्रमुख तसेच तंटामुक्ती निर्मूलन समिती जिल्हा सदस्य म्हणून निवड झाली. नेहरू युवा केंद्रामार्फत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी ‘समता मानव विकास फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय जाण असूनही त्यांनी सत्तेपेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. राजकारण हे समाजबदलाचे साधन असावे, ही त्यांची ठाम भूमिका असून सर्व पक्षांतील मैत्री व सामाजिक ऋणानुबंध त्यांनी जपले आहेत.
सामान्य माणसांच्या समस्यांना मनापासून भिडणारा, निर्भीड भूमिका घेणारा आणि सेवाभावी वृत्ती जपणारे अॅड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे आज सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
विशेष आहे.
अँड. नवनाथजी भद्रे सर आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आपले आयुष्य दीर्घ, निरोगी व समाजकार्याने अधिक समृद्ध होवो, हीच सदिच्छा. पत्रकारिता, कायदा, शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण या सर्व क्षेत्रांतून भविष्यातही जनहिताची कार्ये घडत राहोत हिच सदिच्छा वाढदिवसानिमित्त पुनश्च क्रांतीकारी शुभेच्छा..!
अँड. तथा पत्रकार रणजित जामखेडकर
( विधीज्ञ संभाजीनगर )
