नांदेड- श्रीराम सी स्विमिंग असोसिएशन आयोजित पोरबंदर गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या समुद्रवीर सागरी जलतरण स्पर्धेत आपल्या कै. शांताराम सगणे जलतरणिकेच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रतिकूल समुद्री लाटा आणि लांब पल्ल्याचे अंतर असूनही स्पर्धकांनी जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर ही कामगिरी बजावली. या स्पर्धेत अनेक राज्यातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आपल्या नांदेडच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, सुमारे १५ किलोमीटर अंतराची ही सागरी शर्यत ठराविक वेळेत पूर्ण करताना खेळाडूंनी सुरक्षितता, श्वसन नियंत्रण आणि लाटांशी जुळवून घेण्याची कला प्रभावीपणे दाखवून दिली.
या स्पर्धेत ऋषिकेश उमाकांत बेंबडे १५ किलोमीटर (शिवशक्ती माध्यमिक विद्यालय काकांडी), उत्कर्ष गणेश कदम १० किलोमीटर (पीपल्स हायस्कूल गोकुळ नगर नांदेड), आनंद व्यंकट चिंचोरे पाच किलोमीटर, (पीपल्स हायस्कूल नांदेड) अभिनव नारायण गायकवाड पाच किलोमीटर , सानिध्यात बळीराम अकोले पाच किलोमीटर अंतर पोहून यशस्वी कामगिरी केली. या यशासाठी कै. शांताराम सगणे जलतरनिकेचे मुख्य प्रशिक्षक कोच श्री राजेश सोनकांबळे सर (एन आय एस ), श्री संघर्ष सोनकांबळे सर (एन आय एस कोच) श्री मयूर केंद्रे सर यांचे सातत्यपूर्ण मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या अचूक आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. स्थानिक क्रीडा प्रेमींनी विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. ही कामगिरी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी असून सागरी जलतरण क्रीडेला नवसंजीवनी देणारी आहे. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये असेच यश मिळावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.
