उघड केली भाजपची सत्तालालसेची नितांत नग्नता ‘बटेंगे तो कटेंगे’पासून ‘जुळेंगे तो टिकेंगे’पर्यंत हिंदुत्व भाषणात, सत्ता मात्र काँग्रेस–एमआयएमसोबत!
भारतातील राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याची कल्पनाही जनतेने केली नसेल. पण महाराष्ट्रात जे घडते आहे, ते पाहता आता “खालची पातळी” हा शब्दही अपुरा पडतो आहे. अंबरनाथ नगरपरिषद ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या सत्तालालसेचा आरसा आहे आणि तो आरसा फारच विद्रूप चेहरा दाखवतो आहे.
अंबरनाथमध्ये 59 पैकी 23 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाल्या. भाजपला 14, काँग्रेसला 12. शालेय गणित शिकलेला कोणताही माणूस सांगेल सर्वात मोठा पक्ष अध्यक्ष देतो.
पण इथे गणित नव्हे, कटकारस्थान चाललं.
शिंदे सर्वाधिक, पण अध्यक्ष भाजपचा
तेही काँग्रेसच्या कुबड्यांवर!
एकनाथ शिंदे “मला हलक्यात घेऊ नका” असं ओरडत राहिले, पण भाजपने त्यांना इतकं हलकं घेतलं की थेट बाजूलाच फेकून दिलं. ठाणे जिल्हा ज्याला शिंदेंचा गड म्हटलं जातं त्याच गडात भाजपने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
मागील 30 वर्षे शिवसेनेची सत्ता असलेली अंबरनाथ नगरपरिषद, आणि पहिल्यांदाच शिवसेनेला सत्तेबाहेर ढकलण्यात आलं. का?
कारण भाजपने ठरवलं आहे
शिंदेंना वाढू द्यायचं नाही. कुठल्याही किमतीत नाही.
आणि किंमत काय?
तर काँग्रेससोबत हातमिळवणी!
होय, तीच काँग्रेस जिच्याशी युती म्हणजे कालपर्यंत “हिंदुत्वाचा विश्वासघात” होता.
शंभर-दोनशे कोटींच्या बजेटची नगरपरिषद म्हणजे भाजपसाठी खिशातून पडलेली सुटी. तरीसुद्धा एवढ्या क्षुल्लक सत्तेसाठी भाजपने शिंदेंना नाकारून काँग्रेसची कास धरली.
याला म्हणतात सत्तेसाठी आत्मसन्मान विकणे.
पण हा दुटप्पीपणा इथेच थांबत नाही.
अकोट नगरपरिषदेत भाजपने थेट एमआयएमसोबत युती केली.
मुंबईत “खान महापौर होईल” अशी भीती पसरवणारी भाजप, अकोटमध्ये मात्र एमआयएमला मिठी मारते.
लोकसभेत “बटेंगे तो कटेंगे”,
नगरपरिषदेत “जुळेंगे तो चालेंगे”!
अकोटमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही काँग्रेस-वंचितला दूर ठेवून एमआयएमसह ‘विकास मंच’ स्थापन केला. म्हणजे भाजपसाठी कोण चालतो, कोण नाही याचा एकच निकष आहे:
सत्ता मिळते का नाही.
देशात आणि राज्यात भाजप-शिंदे युतीला वैचारिक, हिंदुत्ववादी, बाळासाहेबांच्या विचारांची सांगितलं जातं. पण अंबरनाथ आणि अकोटमध्ये हे विचार बहुधा नगरपरिषद गेटबाहेर चपला काढून ठेवले गेले.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, तेव्हा भाजपने गळा काढला होता
“हिंदुत्व धोक्यात आलं!”
आज मात्र नगरपरिषदेसाठी काँग्रेसही चालते, एमआयएमही चालते फक्त मित्र पक्ष नको.
स्पष्ट आहे
भाजपला मित्र नकोत, गुलाम हवेत.
जे मान खाली घालतील ते ठीक,
जे स्वतःचा वाटा मागतील ते संपवायचे.
अंबरनाथ ही केवळ सुरुवात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाला दिलेला हा इशारा आहे
“मर्यादेत राहा, नाहीतर संपवा.”
राजकारण इतकं निर्लज्ज कधीच नव्हतं.
आणि तरीही सत्तेच्या हव्यासापुढे तत्व, विचार, हिंदुत्व सगळं नगण्य ठरतं.
आता प्रश्न जनतेसमोर आहे
ही सत्ता हवी म्हणून काहीही करणारी पार्टी, खरंच देश चालवण्याच्या लायकीची आहे का?
