नांदेड – विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागप्रदीप कामले यांनी आज पूर्णा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान सविस्तर पाहणी करून सुरक्षितता, प्रवासी सुविधा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान पूर्णा, हिंगोली आणि वाशिम रेल्वे स्थानकांवर भेट देऊन प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता व्यवस्था तसेच अमृत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची तपासणी करण्यात आली. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पूर्णा–हिंगोली दरम्यानच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 155 ची पाहणी करून सुरक्षितता साधने व कार्यपद्धती तपासण्यात आली. रेल्वे व रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय कामले यांनी बसमत, हिंगोली, वाशिम आणि शिवणी शिवापूर येथील मालधक्का (गुड्स शेड) ची पाहणी करून माल चढउतार सुविधा, पायाभूत संरचना व सुरक्षितता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मालवाहतूक अधिक कार्यक्षम व सुरक्षित पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, अकोला येथील रनिंग रूम व क्रू लॉबीचीही पाहणी करण्यात आली. लोको पायलट व गार्डसाठी उपलब्ध असलेल्या विश्रांती सुविधा, स्वच्छता व देखभाल यावर विशेष भर देत कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कामले यांनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून सुरक्षितता, प्रवासी सेवा व कार्यक्षमता यांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन केले.
