नांदेड – सामाजिक बांधिलकी जपणारी आणि सांस्कृतिक–वैचारिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्यरत असलेली कल्चरल असोसिएशन, नांदेड ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून समाजपरिवर्तनाच्या आपले विविध उपक्रम राबवित आहे. फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे यांच्या विचारपरंपरेतून समता, न्याय, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा जागर करणे, हा संस्थेचा मूलभूत केंद्रबिंदू राहिला आहे. नाट्यसंमेलन, व्याख्यानमाला, परिसंवाद, स्मृती पुरस्कार अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणण्याची भूमिका कल्चरल असोसिएशनने सातत्याने निभावली आहे.यावर्षी कल्चरल असोसिएशन, नांदेड यांच्या वतीने फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे हे व्याख्यानमालेचे तेवीसावे वर्ष आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन पुण्याचे उद्योजक सी. आर. सांगलीकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ व माजी अध्यक्ष – विद्यापीठ अनुदान आयोग, उपस्थित राहणार आहेत.“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावर ते पहिले पुष्प गुंफणार आहेत.
या कार्यक्रमास कल्चरल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर (लातूर), डॉ. गौतम कांबळे (नागपूर), किशोर खांडेकर (माजी सहाय्यक आयुक्त, विक्रीकर, नागपूर) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विठ्ठल खाडे (माजी प्राचार्य, मंगरुळपीर) असतील.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून कॉम्रेड किरण मोघे, ज्येष्ठ महिला अधिकार कार्यकर्त्या, पुणे उपस्थित राहणार असून,“स्त्री चळवळीची वाटचाल : उपलब्धी आणि नवीन आव्हाने” या विषयावर त्या आपले विचार मांडणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमा नवले (माजी उपप्राचार्या, पीपल्स कॉलेज, नांदेड) असतील.या प्रसंगी सन २०२५ चा ‘प्राचार्य अशोक नवसागरे स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे–सोनवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर व सचिव डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले आहे.
