इतिहासाचा घात, की अज्ञानाचा कळस? दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे धक्कादायक विधान
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेत केलेले वक्तव्य हे केवळ बेजबाबदारच नव्हे, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी केलेली उघड छेडछाड ठरावी असे आहे. शहीद-ए-आझम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी “बहिर्या काँग्रेस सरकारला जागे करण्यासाठी” विधानसभेत बॉम्बस्फोट केला, असा दावा करून मुख्यमंत्री गुप्तांनी इतिहासालाच नव्याने लिहिण्याचा धाडसी की धोकादायक प्रयत्न केला आहे.
खरे म्हणजे, 1929 मध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये टाकलेला बॉम्ब हा ब्रिटिश साम्राज्याच्या जुलमी सत्तेविरोधातील क्रांतिकारक इशारा होता. त्या काळी काँग्रेस इंग्रजांविरोधात लढत होती, सत्ता भोगत नव्हती. मात्र मुख्यमंत्री गुप्तांच्या विधानानुसार, शहीदांनी इंग्रजांविरुद्ध नव्हे तर काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलन केले हा इतिहासाचा विपर्यास नव्हे तर काय? या वादग्रस्त विधानावर आम आदमी पार्टीने तीव्र प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला आहे. “जेव्हा इतिहास बदलण्याचा उद्योग सुरू होतो, तेव्हा कळतही नाही की आपण काय आणि कुणाच्या बाजूने बोलत आहोत.”

आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनीही मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर सडकून टीका केली आहे. गुरु तेगबहादूर यांच्या शहीद समारंभाच्या चर्चेदरम्यान हे विधान झाले, हे अधिकच क्लेशदायक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारद्वाज म्हणाले की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांना ‘क्लीन चिट’ देत आहेत, ज्यांनी भारतीयांवर अमानुष अत्याचार केले. स्वर्गात असलेल्या शहीद भगतसिंघजी यांना हे किती वेदनादायक वाटत असेल, याची जाणीव तरी मुख्यमंत्र्यांना आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर रेखा गुप्तांनी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करताना “सुभाष पॅलेस” असा शब्दप्रयोग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ब्रिटिशांनी असेम्ब्ली मध्ये फाशीगृह उभारले होते हे त्यांना मान्य नाही काय ? स्वातंत्र्यलढा झाला होता यावरच मुख्यमंत्र्यांचा विश्वास नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. पुढचा टप्पा म्हणजे, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच अस्तित्वच नव्हते” असे जाहीर करण्याची वेळ येऊ नये, असा उपरोधिक टोला सौरभ भारद्वाज यांनी लगावला. शहीद भगतसिंघजी हे काँग्रेसविरोधी नव्हे, तर ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधातील क्रांतिकारी योद्धे होते. 1929 मधील बॉम्बस्फोट हा सरकार उलथवण्यासाठी नव्हे, तर अन्यायाविरोधात देशाला जागे करण्यासाठी होता हे प्राथमिक ऐतिहासिक ज्ञानही मुख्यमंत्री गुप्तांकडे नसावे, हीच खरी शोकांतिका आहे.

आम आदमी पार्टी सत्तेत असताना सर्व अधिकार उपराज्यपालांकडे होते, रेखा गुप्तांकडे आज केंद्रातील सत्ता, दिल्लीतील सात खासदार, आणि मुख्यमंत्रीपद—सर्व काही आहे. त्यामुळे “जीभ वळली” हा खुलासा इथे चालणार नाही. त्या एखाद्या तळागाळातील कार्यकर्त्या नाहीत, तर राजधानीच्या मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. राहुल गांधींचा एखादा शब्द चुकला, तर त्यांना ‘पप्पू’ ठरवणाऱ्यांनी आता काय करावे? शहीद भगतसिंगांच्या प्रतिमेसमोर उभे राहून माफी मागणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.
या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, इतिहासाशी खेळ करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेत संताप वाढत आहे.
देशवासीयांनो, आज दिल्लीला वाढदिवसाच्या भेटीसारखी मुख्यमंत्री मिळाली आहे आणि आम्हाला त्यांचे असे विधान ऐकावे लागत आहे.
आमचा इतिहास आमच्या डोळ्यांसमोर मोडला जात आहे.
आम्ही फक्त ते जनतेसमोर मांडू शकतो तेवढेच आमचे कर्तव्य आहे.
