आयपीएस ऋषिकेश शिंदे यांची चंदन तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही;८.२१ लाखांच्या मुद्देमालासह ७ आरोपी गजाआड
बीड – जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित चंदनाची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी १०४ किलो चंदन लाकूड, वाहने आणि मोबाईल असा एकूण ८ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, धर्मापुरी ते पानगाव रस्त्यावरील गायराण जमिनीत काही लोक चंदनाची तस्करी करत आहेत. या माहितीची खातरजमा करून शिंदे यांनी आपल्या पथकासह रात्री ९ वाजता त्या ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून सात जणांना रंगेहात पकडले. यामध्ये पप्पू बाबुराव सूर्यवंशी (४०), राहुल पप्पू सूर्यवंशी (२३), तेजस कल्लप्पा कांळीबे (२५), नितीन सटवा जाधव (२२) सर्व राहणार परळी, तसेच अविनाश व्यंकट जाधव (२३), व्यंकट रामचंद्र जाधव (४५) राहणार उदगीर आणि भारत निवृत्ती गायकवाड (४०) राहणार माजलगाव यांचा समावेश आहे.
चंदन लाकूड (१०४ किलो) किंमत ३ लाख रुपये,चंदन साल (३९ किलो) किंमत ३९ हजार रुपये, एक टाटा इंडिगो कार आणि पाच दुचाकी, ७ मोबाईल फोन, लोखंडी तराजू आणि वाकस असा एकूण ८ लाख २१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सतीश कांगणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पीएसआय असद शेख (अंबाजोगाई), सतीश कागणे, बळीराम बासर, बल्लाळ मेजर यांनी सापळा रचून यशस्वीरित्या पार पाडले असून इतक्या मोठ्या प्रमाणात चंदन व ते तस्कर करणारे आरोपी पकडल्यामुळे पोलिसांच्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे..
