भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.- निखिल वागळे
राज्यातील १२ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीतील वास्तव विदारक पद्धतीने समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये जवळपास ७० सदस्य भाजपचे बिनविरोध निवडून आले. ते कसे आले, कोणत्या सौद्यांमधून आले, कोणत्या दबावातून आले, याला आता काहीच महत्त्व उरलेले नाही. महत्त्व एवढेच की त्यांचा “क्रमांक लागला”.
या निवडणुकांमध्ये १२ महानगरपालिकांतील एकूण ३६८ उमेदवार नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. केवळ नांदेडमध्येच ही संख्या ४५ आहे. बी-फॉर्म वाटपाच्या वेळी झालेले गोंधळ, कार्यकर्त्यांची भांडणे, रडारड, नेत्यांच्या दारात लोटांगण हे सारे प्रकार जनतेने प्रत्यक्ष पाहिले आहेत. हे चित्र काहीसे पूर्वी काँग्रेसचे होते; सत्ता गेली आणि काँग्रेस ढासळत गेली. सत्तेच्या शिखरावर पोहोचलेला प्रत्येक पक्ष शेवटी उतरणीला लागतो आणि तोच प्रवास आता भाजपचा सुरू झाला आहे.याच पार्श्वभूमीवर पत्रकार निखिल वागळे यांनी भाजपबाबत केलेली टिप्पणी अधिकच बोचरी ठरते—
“भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.”
या निवडणुकांदरम्यान भाजपमध्ये जितकी बंडखोरी झाली, तितकी बंडखोरी इतर कोणत्याही पक्षात दिसून आली नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही असा उफाळा दिसत नव्हता. एकेकाळी स्वतःला “Party With a Difference” म्हणवणारा भाजप आता खरंच वेगळा राहिला आहे का, की काँग्रेसचीच प्रत बनला आहे हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
अर्जंट बैठका, कार्यालयांमध्ये महिलांचे भोकाड पसरणे, बी-फॉर्मसाठी पाठलाग, नेत्यांच्या गाड्यांच्या टपावर बसलेले कार्यकर्ते, भाजपच्या मेळाव्यातच भाजपवर टीका हे दृश्य लाजिरवाणे नव्हे तर धक्कादायक आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये स्पष्टपणे सांगितले की, भाजपमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशी त्यांच्या पक्षात किंवा इतर विरोधी पक्षांत झालेली नाही हीच त्यांची जमेची बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या गोंधळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः उमेदवारांना “अर्ज परत घ्या” असे सांगावे लागले. हे जरा जास्तच झाले नाही का? भाजपचे कार्यकर्ते अचानक बेशिस्त कधीपासून झाले? नेत्यांचे कार्यकर्त्यांवर नियंत्रण उरलेले नाही का? संघपरिवाराचे संस्कार कुठे गेले असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
संघपरिवाराच्या जवळचे मानले जाणारे पत्रकार यदू जोशी यांनीही या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संघपरिवार यावर गप्प का आहे, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. भाजपचे नवे कार्याध्यक्ष नितीन नवीन यांनी “आमदार-खासदारांच्या मुलांना तिकीट देऊ नका” असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र घराणेशाही ठळकपणे दिसते. काही ठिकाणी एकाच घरातील दोन-तीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. हा प्रकार सर्व १२ महानगरपालिकांमध्ये दिसून आला आहे.
ज्या घराणेशाहीवर भाजप सातत्याने काँग्रेसवर आरोप करत होता, तीच घराणेशाही आज भाजप स्वतः चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसते. इतर पक्षांतही घराणेशाही असते, हे खरे; पण भाजपने किमान त्याच वाटेवर चालू नये, अशी अपेक्षा होती—ती मात्र फोल ठरली.
या निवडणुकांमध्ये भाजपने ३३७ ‘आयात’ उमेदवारांना तिकीट दिले आहे फक्त त्यांच्या निवडून येण्याच्या शक्यतेवर. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह अनेक शहरांत बाहेरून आलेल्यांची संख्या धक्कादायक आहे. त्यामुळे आता भाजप हा “आयाराम-गयारामांचा पक्ष” बनला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही. २०१४ पासून भाजपने आपले सर्व दरवाजे खुले ठेवले आणि आज त्याचे परिणाम दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत “आरोपी जेलमध्ये जायला हवा की नाही?” असा प्रश्न जनतेला विचारला होता. मात्र त्याच आदर्श घोटाळ्यातील आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये सामील झाले आहेत हा विरोधाभास नाही तर सत्तेची उघडी दांभिकता आहे.
घराणेशाही, गुंड प्रवृत्ती, आयात नेते, संपत्ती आणि सत्तेची लालसा—हे भाजपसाठी नवे नाही. केंद्र, राज्य, महानगरपालिका आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सत्ता हवीच, या हव्यासातूनच हा सारा तमाशा सुरू आहे. म्हणूनच निखिल वागळे यांचे शब्द अधिकच वास्तववादी वाटतात—
भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.
