आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन 

नांदेड – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागरिक देवमित्त धम्मपाल, महास्थवीर गुणानंद सुमंगल,‌ बौद्ध विद्वान जी. आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौद्ध धम्म ध्वजाची’ निर्मिती केली. हा ध्वज जगातील सर्व देशांतील विद्वान विचारवंत आणि महान भिख्खू संघाने स्वीकार केला. विश्व बुद्ध धम्म ध्वज दिन समस्त भारतीय बौद्धांचा सण, उत्सव, सोहळा व्हावा तसेच या दिवशी बौद्धांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र यावे यासाठी शहरात ८ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त सकाळी ७ वाजेपासून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
            तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने खुरगाव येथून शहरातील रेल्वे स्टेशननजिकच्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत १४६ फुटांच्या महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून खुरगाव, पासदगाव, नेरली फाटा, भावसार चौक, तरोडा नाका, राज काॅर्नर, आयटीआय काॅर्नर,भ. बुद्ध पुतळ्याची नियोजित जागा, फुले स्मारक, शिवाजी नगर, कला मंदिर या मार्गाने जाऊन पदयात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच होणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली. पदयात्रेच्या नियोजनात सर्व भिख्खू संघ, आंबेडकरी चळवळीतील संघटना, धम्म संघटना, बौद्ध उपासक उपासिका, नेते, कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!