वाहेगुरू .. वाहेगुरू.. वाहेगुरू.. वाहेगुरू.. च्या घोषाने दुमदुमले नांदेड शहर 

नांदेड –  दशम पातशाह श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांचा ३५९ वा प्रकाश पर्व (जन्मोत्सव) काल नांदेड शहरात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शहर “वाहेगुरू… वाहेगुरू…” या जयघोषाने दुमदुमून गेले.

सकाळपासूनच सचखंड श्री हजूर साहिब येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कीर्तन, पाठ आणि सेवा उपक्रमांचा समावेश होता. अनेक कीर्तनकारांनी आपल्या वतीने धार्मिक सेवा अर्पण केली.

दुपारी सुमारे तीन वाजता गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी यांनी अरदास  (प्रार्थना) करून भव्य नगर कीर्तनास सुरुवात केली. सायंकाळी नांदेड शहरातून निघालेले हे नगर कीर्तन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.भाविकांनी अनेक ठिकाणी आरती केली. निशाण साहिबजीचे दर्शन घेतले.अनेक ठिकाणी भाविकांनी लंगर (प्रसाद) आयोजित केले होते. 

नगर कीर्तनाने गुरुद्वारा चौक, वजीराबाद चौक, गांधी पुतळा या मार्गाने फेरी मारून पुन्हा सचखंड श्री हजूर साहिब येथे समारोप केला. यावेळी श्री गुरु गोविंद सिंघजी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

नगर कीर्तनात विविध धार्मिक वाद्ये, भजनी मंडळ्या तसेच गुरु महाराजांचा अश्व ही प्रमुख आकर्षणे ठरली. भाविकांनी श्रद्धेने गुरु महाराजांच्या रथापुढे पाणी शिंपडून मार्ग स्वच्छ ठेवत सेवा केली.या उत्सवामुळे नांदेड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून शांततामय वातावरणात कार्यक्रम पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!