विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद नांदेड – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज ५ मार्च २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी (बीडीओ) तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला. या संवादादरम्यान विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अकृषिक रुपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली, संपुष्टात आणण्याची प्रक्रिया, एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा तसेच अभिलेख अद्ययावत करण्यासंदर्भातील विविध सुधारणा यांची माहिती ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रसार अभियान राबविण्याचे निर्देश दिले. याशिवाय महसूल विभागाबरोबरच इतर शासकीय विभागांच्या सेवांबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजन करण्यास सांगण्यात आले. नागरिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित तक्रारी तसेच दैनंदिन सेवा एकाच खिडकीतून मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या समाधान शिबिरांद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच या अभियानाची माहिती प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामसभा, दवंडी, सूचना फलक, सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांना शिबिरांची माहिती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. गावपातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व समाधान शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विषयक अडचणी व प्रलंबित बाबी मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच व संबंधित यंत्रणांनी या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्य करावे, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. Kanthak Suryatal Post Views: 685 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन