जवळा दे. येथील प्राथमिक शाळेत वीर बाल दिन साजरा

रंगभरण चित्रकला स्पर्धेतून साहिबजादे यांना अभिवादन; भाषण, कथाकथन आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन
 
वीर बाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार
नांदेड- दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिन हा देशव्यापी उत्सव म्हणून आयोजित केला जातो. जो भारताच्या भविष्याचा पाया म्हणून मुलांना सन्मानित करण्यासाठी केला जातो. सदर उपक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे. शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग आणि राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आदेशित करण्यात आले होते. यानुसार जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वीर बाल दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच निबंध लेखन, भाषण स्पर्धा
आणि कथाकथन स्पर्धाही घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मनिषा गच्चे, शेषराव सगर, पांडुरंग गच्चे यांची उपस्थिती होती.
             वीर बाल दिवस ह दरवर्षी शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो, ज्यांनी धर्मासाठी आणि न्यायासाठी आपले प्राण दिले, आणि भारत सरकारने २०२२ मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे मुलांना त्यांच्या बलिदानाची माहिती मिळते. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात साहिबजाद्यांच्या बलिदानाबद्दल माहिती दिली जाते. याचाच एक भाग म्हणून मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमाकांत बेंबडे आणि संगिता बडवणे यांनी स्पर्धेचे नियोजन करुन स्पर्धा यशस्वी केली. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. त्यापुर्वी विद्यार्थ्यांना या दिनाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!