नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तलबीड येथे जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या जुगाऱ्यांकडून एकूण 6 लाख 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात 1 लाख 8 हजार 800 रुपये रोख रक्कम आहे.
दि.25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वात नायगाव येथील पोलीस उपनिरिक्षक गजानन तोडेवाड, सुरज तिडके, पोलीस अंमलदार मुद्देमवाड, भगवान कोतापल्ले, सुदाम जाकोरे, गजानन चापलकर, विनोद भंडारे, गाजूलवार, अंभोरे, ममताबादे, बालाजी शिंदे या पथकाने मौजे तलबीड ता.नायगाव येथे छापा टाकला.
त्या ठिकाणी शेख खदीर दस्तगिर, माधव कोंडीबा सुगावे रा.घुंगराळा ता.नायगाव, गणपती गोविंदराव जाधव रा.सुगाव ता.नायगाव, भगवान गणपती ढगे, साईनाथ बाबु गायकवाड, माणिका बळी वानखेडे, हनुमंत गंगाधर वानखेडे,नागोराव आनंदा गायकवाड रा.सावरखेड ता.नायगाव, अविनाश प्रकाश माचनवाड रा.हंगरगा ता.उमरी, शंकर गणपती देवडे रा.इतवारा नांदेड, संजय शंकर बानेवाडी रा.घुंगराळा ता.नायगाव आणि गणेश बालाजी पवळे रा.पोपरा ता.नायगाव हे सर्व अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. पोलीस पथकाने यांच्याकडून 9 मोबाईल, 5 दुचाकी गाड्या आणि 1 लाख 800 रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 11 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार बालाजी शिंदे यांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्या या 12 जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 267/2025 दाखल करण्यात आला आहे.
अंदर-बाहर खेळणाऱ्या 12 जुगाऱ्यांना पकडून 1 लाख रुपये रोख रक्कमेसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
