नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख रुपयांची लाच मागणी करून 1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकास लाच देण्यास आणि घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अंमलदारास विशेष न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. इतरांसाठी पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलीसांना या प्रकरणामुळे पोलीस कोठडीत जावे लागले आहे. या पोलीस कोठडी मागणी अर्जात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व लोकांना मॅनेज करावे लागते असे सांगून लाच घेतली आहे. म्हणून आरोपी पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी किंवा लोकसेवक किंवा इतर सहकाऱ्यांचा शोध घ्यायचा आहे त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात केलेल्या सादरीकरणानुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गोविंद बालाजीराव जाधव (57) आणि पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी तांबोळी (43) बकल नंबर 682 यांनी काल दि.23 डिसेंबर रोजी एका महिलेकडून 1 लाख रुपयांची लाच मागणी केली आणि ती स्विकारली. मुळात या प्रकरणी मागणी दोन गुन्ह्यात मदत करण्यासाठी 3 लाख रुपयांची होती. परंतू प्रत्यक्षात एक लाख रुपये स्विकारले. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक करीम खान पठाण यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 512/2025 दाखल करण्यात आला आहे.
आज पकडलेल्या पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव आणि पोलीस अंमलदार वैजनाथ तांबोळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राहुल तरकसे , पोलीस अंमलदार प्रदीप कंधारे, दाभनवाड, साईनाथ आचेवाड यांनी न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी न्यायालयास सांगितले की, सर्वांना मॅनेज करावे लागते म्हणून लाच घेतलेली आहे. तेंव्हा ज्यांना मॅनेज करायचे ते कोण आहेत? ते आरोपींचे वरिष्ठ अधिकारी किंवा इतर लोकसेवक किंवा इतर सहकारी आहेत काय याचा तपास करायचा आहे. दोन्ही आरोपींचे आवाजाचे नमुने घेणे शिल्लक आहेत यासाठी पोलीस कोठडी द्यावी. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव आणि पोलीस अंमलदार वैजनाथ तांबोळी यांना 1 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्यावतीने ऍड. बी.एन.शिंदे यांनी काम पाहिले तर पोलीस अंमलदार वैजनाथ तांबोळी यांच्यावतीने दुसऱ्या पिढीतील वकील ऍड.मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी काम पाहिले. या प्रकरणातील लाच स्विकारणारे पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव हे आपल्या जीवनात पोलीस पदक विजेते व्यक्ती आहेत.
संबंधीत बातमी…
विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस अंमलदार १ लाखांची लाच घेताना अडकले
