नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत हा प्रकार पैशांच्या देवाण घेवाणीतून घडल्याचे सांगितले. मात्र, काही तासांनंतर जेव्हा जीवन घोगरे पाटील स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले, तेव्हा समोर आलेले वास्तव त्या पोस्टला छेद देणारे ठरले.
पोलीस ठाण्यात आलेल्या जीवन घोगरे पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती, डोक्यावर पट्टी बांधलेली होती आणि त्यांच्यावर निर्दय मारहाण झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. खुर्चीवर बसताच त्यांनी थेट आरोप केला की, “मी मागील अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, नांदेडचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सातत्याने अर्ज देत आहे की मला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्याकडून जीवाला धोका आहे, मला पोलीस संरक्षण द्यावे. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.”
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे बारा वाजता सिडको भागातील रस्त्यावरून जात असताना जीवन घोगरे पाटील यांच्या वाहनासमोर अचानक एक चारचाकी वाहन आडवे लावण्यात आले. त्यातून काही व्यक्ती उतरल्या, त्यांनी जीवन घोगरे पाटील यांना बळजबरीने आपल्या गाडीत कोंबले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, अपहरणाचा हा प्रकार उघडपणे दिसून येतो.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यानंतर समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमधून या गंभीर गुन्ह्याला फक्त पैशांच्या व्यवहाराचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळातच जीवन घोगरे पाटील स्वतः पोलीस ठाण्यात जखमी अवस्थेत पोहोचले आणि त्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची होती.
महत्त्वाचे म्हणजे, हे प्रकरण पहिले नाही. मागील वर्षी संतोष वडवळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवकाला देखील अशाच पद्धतीने पळवून नेऊन मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणातही संतोष वडवळ यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र आणि यांची नावे स्पष्टपणे घेतली होती. मात्र, त्या वेळी ती नावे वगळूनच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आतापर्यंत जीवन घोगरे पाटील यांच्या तक्रारीवर नेमका कोणता गुन्हा दाखल झाला आहे, हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही ठराविक नावे वगळूनच तक्रार घेण्याची तयारी पोलीस दाखवत आहेत, अशी गंभीर बाब समोर येत आहे.
सार्वजनिक रस्त्यावरून एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याला बळजबरीने उचलून नेणे, मारहाण करणे आणि त्याआधी दिलेल्या संरक्षणाच्या अर्जांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हा प्रकार साधा नसून तो थेट कायदा व सुव्यवस्थेवरचा घाला आहे.
जर अशीच पद्धत सुरू राहणार असेल, निवडक नावे वगळून गुन्हे दाखल होणार असतील, तर नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे तरी कुठे? आणि कायदा सर्वांसाठी समान आहे की काहींसाठीच मवाळ?
हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे आणि तो प्रश्न आम्ही थेट वाचकांसमोर ठेवत आहोत.
व्हिडिओ क्रमांक एक
व्हिडिओ क्रमांक दोन
