अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून वस्तुस्थितीचा खुलासा

नांदेड- अलीकडच्या कालावधीत समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तींमार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबाबत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या माहितीतून महामंडळाची बदनामी होत असून मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.

 

राज्य शासनामार्फत विविध शासकीय विभाग, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद निश्चित केली जाते. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असून, त्याअंतर्गत प्रत्येक विभाग व महामंडळास वार्षिक इष्टांक (Targets) निश्चित करणे बंधनकारक असते.

 

राज्यातील इतर आर्थिक विकास महामंडळांप्रमाणेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फतही वार्षिक इष्टांक निश्चितीची कार्यवाही करण्यात येते. त्या इष्टांकाच्या मर्यादेतच वित्तीय दायित्व निर्माण करणे नियमानुसार आवश्यक आहे. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून काही नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिचे पालन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांवर बंधनकारक आहे.

 

आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केवळ महानगरपालिका क्षेत्र तसेच निवडणुका प्रलंबित असलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या हद्दीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील इतर भागात पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

 

आदर्श आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रांमध्ये पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महामंडळाबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा अथवा चुकीच्या माहितीवर मराठा बांधवांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटिबद्ध असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!