नांदेड – “उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी” अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदा माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रति वर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी मानकऱ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प. माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांची उपस्थिती होती.

मानकऱ्यांचा गौरव -पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकदंडे, आंबादास खंडेराव जहागीरदार या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने जोड आहेर, मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी -उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजूरी उत्तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यासोबत यात्रेत विविध साहित्य-सामानाचे दुकाने सजली आहेत. यामध्ये बैलाचा साज, पुजेचे साहित्यासह उंच उंच आकाश पाळणे, सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.यंदा यात्रेत वाघ्या-मुरळी, पोतराज व डफवाल्यांच्या सहभागाने वातावरण भक्तीमय झाले होते. भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्लॅस्टिकमुक्त व स्वच्छ यात्रेचा संकल्प राबविला जात आहे. याबाबतचे चोख नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तगडी व्यवस्था, भाविकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही चोख नियोजन करण्यात आले आहे.

पालखी पुजनाच्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूर कुमार आंदेलवाड, शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह विविध विभागचे खाते प्रमुख, अधिकारी, यांची उपस्थिती होती. उद्या पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदशर्न व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.



