प्रशासनाने लोकाभिमुख व पारदर्शकपणे कार्य करावे– मुख्य सचिव राजेश अग्रवाल

छत्रपती संभाजीनगर — शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविताना त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने लोकाभिमुख राहून पारदर्शकपणे कार्य करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.

 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागाची आढावा बैठक मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 या बैठकीत मुख्य सचिवांनी प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती घेतली. योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करून कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना योजनांची माहिती सहज, सुलभ व स्थानिक भाषेत दिली जावी, तसेच त्यांच्या समस्या समजून घेऊन तातडीने निराकरण करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 योजना प्रभावीपणे राबविताना विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, प्रशासनाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मुख्य सचिव म्हणाले.शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून सेवा देताना पारदर्शकता, गती महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.

 बैठकीत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना जमिनीचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या बाबी, तसेच शासकीय सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासह प्रमुख पायाभूत प्रकल्प, विविध विभागांच्या मंजुरीअभावी प्रलंबित असलेले प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मुख्यमंत्री कृषी सौर योजना, ग्रामीण भागातील उद्योगविकास, तसेच सातबारावरील खरेदी-विक्री व्यवहारांबाबतही मुख्य सचिवांनी सखोल आढावा घेतला.विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील प्रगती तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!